संतापजनक! 2500 रुपये लाच न दिल्याने रुग्णालयाने केली नाही महिलेची डिलिव्हरी'; बाळाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:10 AM2023-05-29T10:10:21+5:302023-05-29T10:16:14+5:30
गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्याच्या बदल्यात तिच्या पतीकडे लाच मागितल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशातील हरदोई येथील सरकारी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. लाचखोरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आठवडाभरापूर्वी गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्याच्या बदल्यात तिच्या पतीकडे लाच मागितल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण हरदोई जिल्ह्यातील सामुदायिक आरोग्य केंद्र बिलग्रामशी संबंधित आहे. रिपोर्टमध्ये लाच न दिल्याने तिला दाखल करण्यास नकार दिल्याचे म्हटलं आहे.
दुसऱ्या दिवशी पैशांची व्यवस्था करून तरुणाने गरोदर पत्नीला सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, तेथे खूप समजावून सांगितल्यानंतर पत्नीवर उपचार सुरू करण्यात आले. मजरा सरौना गावातील रहिवासी रीशेन्द्र कुमार याची पत्नी गरोदर होती. रीशेन्द्र कुमार यांच्या म्हणण्यानुसार, 18 मे रोजी त्याची पत्नी मनिषाला प्रसूती वेदना होत असताना तिला बिलग्राम येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे कर्तव्यावर असलेल्या 3 नर्सनी पत्नीला दाखल करण्यासाठी 2500 लाच मागितली.
आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगताच त्याचा तेथून हाकलून देण्यात आला, त्यानंतर तो आपल्या गावी परतला. दुसऱ्या दिवशी लोकांकडून 1500 रुपये मागून त्याने पत्नीसह सामुदायिक आरोग्य केंद्र गाठले. खूप समजावून सांगितल्यानंतर पत्नीला 1500 रुपये घेऊन दाखल करण्यात आले. त्याच्या पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. नंतर पत्नीने एका मुलाला जन्म दिला, ज्याला वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले तेथे त्याचा मृत्यू झाला.
रीशेन्द्र कुमार याच्या म्हणण्यानुसार, ड्युटीवर असलेल्या नर्स आणि आशा कर्मचार्यांनी त्याच्याकडे लाच मागितली होती. पत्नीला योग्य वेळी दाखल केले असते तर मुलाचे प्राण वाचू शकले असते. संतप्त तरुणाने त्याच दिवशी आपल्या मोबाईलवरून व्हिडीओ बनवून नर्सचे हे कृत्य सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याशिवाय या तरुणाने सीएमओ, डीएम, एसपी यांना निवेदन देऊन रुग्णालयातील नर्स आणि आशा वर्कर्सवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी सीएमओने तपास पथक स्थापन केले असून संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.