राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, रात्रीपासूनच अयोध्या धाममध्ये लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 08:18 AM2024-01-23T08:18:50+5:302024-01-23T08:20:23+5:30

मंगळवारी (२३ जानेवारी) सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Devotees gather in large numbers at Shri Ram temple on the first day after the Pran Pratishtha ceremony, Ayodhya, Uttar Pradesh  | राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, रात्रीपासूनच अयोध्या धाममध्ये लांबच लांब रांगा

राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, रात्रीपासूनच अयोध्या धाममध्ये लांबच लांब रांगा

अयोध्या : अयोध्येतील मंदिरामध्ये रामचंद्राच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी 'देवापासून देशाकडे' आणि 'रामापासून राष्ट्राकडे' असा नवा मंत्र दिला. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्याधाममध्ये लोकांची गर्दी होऊ लागली आहे. अयोध्येला पोहोचणाऱ्या हजारो भाविकांना कोणत्याही मार्गाने लवकरात लवकर मंदिरात पोहोचून श्रीरामाचे दर्शन घ्यायचे आहे. 

मंगळवारी (२३ जानेवारी) सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काल रात्री उशिरापासूनच राम मंदिराच्या मुख्य गेटबाहेर भाविकांची मोठी रांग लागली होती. पहाटे 2 वाजल्यापासून येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. गर्दीत उपस्थित लोक गेटसमोर ‘जय श्री राम’चा जयघोष करत मंदिरात प्रवेश करत आहेत. देशभरातून भाविक अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी येत आहेत. यासोबतच अयोध्येतील स्थानिक रहिवासीही राम मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी पोहोचत आहेत.

दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या जवळपास दोन आठवड्यांपूर्वी अयोध्येतील हॉटेल बुकिंग ८० टक्क्यांनी वाढले आहे. येथे हॉटेलमधील एका दिवसाच्या खोलीची किंमत सर्वकालीन उच्च दरावर पोहोचली आहे, जी पाच पटीने वाढली आहे. काही आलिशान खोल्यांचे भाडे एक लाख रुपयांपर्यंत गेले आहे. विशेष म्हणजे भाड्यात एवढी वाढ होऊनही हॉटेल बुकिंग दररोज वाढत आहे.

याचबरोबर, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर हे शहर आता देशातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या शहराला वर्षांला किमान पाच कोटी पर्यटक भेट देऊ शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिरापेक्षाही अयोध्येतील राम मंदिरात अधिक भाविकांचा ओघ असण्याची शक्यता आहे.

Web Title: Devotees gather in large numbers at Shri Ram temple on the first day after the Pran Pratishtha ceremony, Ayodhya, Uttar Pradesh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.