एकाच प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे...! योगींच्या मंत्र्याने विधानसभेत उत्तर दिले, अधिकाऱ्यावर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 08:16 PM2023-12-02T20:16:55+5:302023-12-02T20:17:13+5:30
उत्तर प्रदेशच्या विधानसभेत हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी प्रश्नोत्तर काळात सपाचे मनोज पांडे यांनी प्रश्न विचारला होता.
उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये आज एक विचित्र प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या साखर उद्योग मंत्र्यांनी एकाच प्रश्नाची दोन वेगवेगळी उत्तरे दिल्याने विधानसभा अध्यक्ष नाराज झाले. या प्रकारातून मंत्री सुटले परंतू त्यांना उत्तर लिहून देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईचे खापर फुटले आहे.
उत्तर प्रदेशच्या विधानसभेत हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी प्रश्नोत्तर काळात सपाचे मनोज पांडे यांनी प्रश्न विचारला होता. वाहतूकदारांकडून शिधा पोहोचविताना प्रत्येक पिशवीतून पाच किलो रेशन कमी केल्याच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या? असा सवाल त्यांनी विचारला होता. यावर मंत्रीमहोदयांनी एकही नाही असे उत्तर विधानसभेत दिले होते.
यावर मनोज पांडेय यांनी अशा प्रकारच्या दोन प्रकरणांची माहिती सभागृहाला दिली. यावेळी मंत्री चौधरी लक्ष्मीनारायण यांनी लगेच सावरत अशा तीन तक्रारी प्राप्त झाल्याची कबुली दिली. या तक्रारी शाहजहापूर, रायबरेली आणि अमेठी जिल्ह्यातून आल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले. तसेच या प्रकरणांत एफआयआर नोंदविला असून वाहतूकदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
यावरून पांडेय यांनी मंत्र्यांना धारेवर धरले. एकाच प्रश्नाची दोन उत्तरे कशी काय असू शकतात, सभागृहाची दिशाभूल केली जातेय, असा आरोप केला. यावर अध्यक्षांनीही नाराजी व्यक्त करत अशी उत्तरे पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.