रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मिळणार आरोग्य सुविधा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 10:57 AM2023-12-11T10:57:48+5:302023-12-11T11:02:06+5:30
रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्ण तयारी करत आहे.
अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. पुढील वर्षात म्हणजेच २२ जानेवारी २०२४ रोजी श्री रामजन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत प्राणप्रतिष्ठेनिमित्त लाखो भाविक अयोध्येत दाखल होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचे कामही प्रशासन करत आहे.
दरम्यान, रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्ण तयारी करत आहे. याचबरोबर, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्यावतीने देशभरातील वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी क्षेत्रातील डॉक्टरांना स्वयंसेवीसाठी गुगल फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या कामाची जबाबदारी राजर्षी दशरथ मेडिकल कॉलेज आणि ट्रस्टचे वैद्यकीय समन्वयक डॉ. पीयूष गुप्ता यांच्याकडे सोपवली आहे.
डॉ. पीयूष गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, राम मंदिरातील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमादरम्यान केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील डॉक्टरांनी भाविकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी अर्ज केले आहेत. तसेच, गुगल फॉर्मची लिंक नॅशनल मेडिकल ऑर्गनायझेशन (NMO) आणि आरोग्य भारती मार्फत पाठवली जात आहे. हे ओपन केल्यानंतर फॉर्म भरता येईल, असे डॉ. पीयूष गुप्ता यांनी सांगितले.
याचबरोबर, या आरोग्य सेवेसाठी दिल्लीतील एम्ससह चंदीगड आणि उत्तर प्रदेशातील अनेक डॉक्टरांकडून अर्ज आले आहेत. १५ डिसेंबरनंतर सर्व अर्जांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांचे नाव, पदवी, निवासस्थान आणि राज्याची पडताळणी केली जाईल. तसेच, पाससह क्यूआर कोड जारी केला जाईल, असे डॉ. पीयूष गुप्ता यांनी सांगितले. तर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेंद्र कुमार यांनी सांगितले की, ट्रस्टने त्यांना अयोध्येत येणाऱ्या या डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.