दोस्त दोस्त ना रहा; विहीरीत बुडून मृत पावलेल्या मित्राच्या खुनाचे रहस्य उलगडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 11:42 AM2023-12-29T11:42:53+5:302023-12-29T11:43:20+5:30
कानपूर येथे २० डिसेंबर रोजी २१ वर्षीय पवन कुमार काही सामान खरेदी करण्यासाठी घरातून बाहेर गेला होता.
उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे १० दिवसांपूर्वी एका युवकाचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदनही केले, त्यातून हा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी केली सून मृत युवकाच्या मित्राकडे तपास केला. त्यावेळी, मित्रानेच मित्राचा घात केल्याचं तपासातून उघडकीस आलं. याप्रकरणी, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
कानपूर येथे २० डिसेंबर रोजी २१ वर्षीय पवन कुमार काही सामान खरेदी करण्यासाठी घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर, तो गायब झाल्याचं लक्षात आलं, त्याची शोधशोध करण्यात आली. त्यावेळी, ४ दिवसांनंतर एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला होता. पवनचे कोणाशीच भांडणं किंवा वैर नव्हते. त्यामुळे, त्याच्या कुटुंबीयांनीही कोणावर संशय घेतला नाही. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज सर्वांनीच व्यक्त केला. तर, शवविच्छेदन अहवालातूनही तीच माहिती समोर आली.
या घटनेनंतर काही दिवसांनी पवन ज्या दिवशी गायब झाला, त्यादिवशी त्याच्या मित्रासोबत दारुच्या दुकानावर दिसून आला होता. तेथून तो घरीच येणार होता, पण तो घरी आला नाही. कुटुंबीयांनी पवनच्या मित्राकडे याबाबत विचारणा केली असता आम्हाला काही माहिती नाही, असे म्हणत त्याने उडवाउडवीचे उत्तर दिलं. विशेष म्हणजे पवनला आपण ओळखत नसल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे, कुटुंबीयांनी पोलिसांना सर्व माहिती दिली.
अशी उघडकीस आली घटना
पोलिसांनी घटनेची सखोल माहिती घेऊन दारुच्या दुकानाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये, पवनसह त्याचा मित्र आणि आणखी एक असे तीनजण दारुच्या दुकानाजवळून जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे, पोलिसांनी पवनचा मित्र आणि सोबत असलेल्या अल्पवयीन मुलाची चौकशी केली असता हा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. पवनसह हे तिघेही घरी येत होते, त्याचवेळेस अल्पवयीन मुलासोबत पवनचा वाद झाला. त्या वादातून अल्पवयीन मुलाने पवनला जोराने धक्का दिला. त्यामुळे, तो जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. या घटनेने घाबरलेल्या दोघांनीही पवनला उचलून विहिरीत ढकलून दिले. या विहिरीत भरपूर पाणी असल्याने पाण्यात बुडून पवनचा मृत्यू झाला.
दरम्यान, २२ डिसेंबर रोजी पवनला विहिरीतून बाहेर काढले असता, त्याच्या मृतदेहावर कुठेही जखम आढळून आली नाही. याउलट त्याचा मृत्यू पाण्यात बुडूनच झाल्याचे शवविच्छेदन अहवालात आढळून आले.