मोठ्या जावयाला १५ लाखांची कार दिली, धाकट्याने लव्ह मॅरेजनंतर १५ दिवसांत पत्नीचा बळी घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 10:32 AM2024-07-30T10:32:52+5:302024-07-30T10:33:11+5:30
अनामिका आणि अतुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. यामुळे लग्नात अतुलच्या घरच्यांनी काहीच हुंडा मागितला नाही. लग्नानंतर दुसऱ्या दिवसापासून त्रास सुरु झाला.
उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये हुंडाबळीची घटना घडली आहे. मोठ्या जावयाला लग्नावेळी १५ लाखांची कार दिलेली म्हणून धाकट्या जावयाने लव्ह मॅरेजवेळी कोणतीही मागणी न करता लग्नाच्या १५ दिवसांनी पत्नीला जबर मारहाण करत जीव घेतला आहे.
बिछवा गावातील अनामिका ही तरुणी बेसिक टीचिंग सर्टिफिकेट कोर्स शिकत होती. तिथेच अतुलही शिकत होता. दोघांनी लग्न करण्याचे ठरविले तेव्हा अतुलच्या घरच्यांनी काहीही हुंडा मागितला नव्हता. लग्न पार पडले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून अनामिकाला १५ लाखांची कार दिली नाही म्हणून मारहाण सुरु झाली. अतूल हा भीकनपूर गावातील रहिवासी आहे.
रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अतुलने अनामिकाच्या आईला फोन करून तुमच्या मुलीला समजवा नाहीतर गळा दाबून मारून टाकेन अशी धमकी दिली आणि फोन बंद केला. लग्नानंतरच्या १५ दिवसांतही अनामिकाने अनेकदा फोन करून घरच्यांना आपल्याला मारहाण होत असल्याचे सांगितले होते. मोठ्या जावयाला १५ लाखांची कार दिली, आपल्याला का दिली नाही असे विचारून तिला पती आणि त्याचे कुटुंबीय मारहाण करत आहेत, असे तिने सांगितले होते, असे अनामिकाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे.
यानंतर शनिवारी सायंकाळी अनामिकाच्या वडिलांनी अतुलला फोन करून बसून मुद्दा सोडवू असे सांगितले होते. परंतू, रविवारी पहाटे अनामिकाचा फोन आला की सासरचे तिला मारहाण करत आहेत. यानंतर जावयाने फोन केला व मुलीला समजविण्याची धमकी दिली. थोड्यावेळाने पुन्हा जावयाने फोन करून तुझी मुलगी मेली आहे तिला घेऊन जा, असे सांगितल्याचे अनामिकाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.
यामुळे घाबरलेले अनिमिकाचे वडील उदयवीर हे तिच्या सासरी गेले, तिथे त्यांनी मुलीचा मृतदेह निपचित पडलेला पाहिला. उदयवीर यांनी पोलिसांत धाव घेत अतुल आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. एसपी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यासाठी शोध घेतला जात आहे.