'मिट्टी में मिला देंगे...', उत्तर प्रदेशातील 'योगी'राजमध्ये सात वर्षात 12 हजार एन्काउंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 07:22 PM2024-10-17T19:22:04+5:302024-10-17T19:22:36+5:30
Encounter In Yogi Adityanath Tenure: योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातील पोलिसांना फ्री हँड देण्यात आला आहे.
Bahraich Encounter :उत्तर प्रदेशातील बहराइच हिंसाचाराच्या मुख्य आरोपींचा पोलिसांनी आज एनकाउंटर केला. नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींच्या पायावर पोलिसांनी गोळी झाडली असून, सध्या आरोपींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आजच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि यूपी पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही आठवड्यांपूर्वी एक डेटा समोर आला होता, ज्यामध्ये योगींच्या काळात झालेल्या चकमकींची आकडेवारी देण्यात आली होती.
या आकडेवारीनुसार, योगी सरकारच्या काळात पहिली चकमक सहारनपूरमध्ये झाली. 2017 मध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात मन्सूर पहेलवानचा पहिला एनकाउंटर झाला होता. यानंतर पोलिसांनी अनेक कुख्यात गुंडांचा एन्काउंटर केला. यातील अनेक एन्काउंटरवर प्रश्नही उपस्थित केले गेले आहेत.
योगींच्या कार्यकाळात किती चकमकी झाल्या?
20 मार्च 2017 ते 5 सप्टेंबर 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार यूपी पोलिसांनी एकूण 12 हजार 964 चकमकींची माहिती दिली आहे. यामध्ये 207 संशयित गुन्हेगारांचा मृत्यू झाला असून 27 हजार 117 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या चकमकीत 1 हजार 601 गुन्हेगार जखमीही झाले आहेत. या आकडेवारीनुसार, सरासरी दर 13व्या दिवशी एका गुन्हेगाराशी चकमक झाली आहे.
किती पोलीस शहीद झाले?
या चकमकीत फक्त गुन्हेगारच मारले गेले नाही, तर 17 पोलीसही शहीद झाले आहेत. याशिवाय, हजारो पोलीस जखमीही झाले आहेत. योगी सरकारच्या काळात मारल्या गेलेल्या गुन्हेगारांवर 75 हजार रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
चकमकीत मारल्या गेलेल्या गुन्हेगारांची जात
जातीनिहाय गुन्हेगारांवर नजर टाकली, तर या चकमकीत मुस्लिम गुन्हेगार 67, ब्राह्मण 20, ठाकूर 18, यादव 16, दलित 14, एसटी 3, शीख 2, इतर ओबीसीतील 8 गुन्हेगार मारले गेले आहेत. याशिवाय इतर जाती-धर्मातील एकूण 59 गुन्हेगार मारले गेले आहेत. दरम्यान, योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर चकमकी आणि बुलडोझर कारवाईची सुरुवात झाली.