चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; 4 मुलांचा होरपळून मृत्यू तर आई-वडील गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 05:47 PM2024-03-24T17:47:43+5:302024-03-24T17:48:00+5:30
ही घटना इतकी लवकर घडली की, बचावासाठी कुणालाही काही करता आले नाही.
Mobile Phone Blast:उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन घराला आग लागली, यात चार निष्पाप मुलांचा होरळून मृत्यू झाला, तर मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात पालकही गंभीररित्या भाजले. सध्या जखमी पालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण मेरठच्या पल्लवपुरम पोलीस स्टेशन हद्दीतील जनता कॉलनीचे आहे. शनिवारी रात्री उशिरा संपूर्ण कुटुंब घरात हजर होते. त्यांनी आपला मोबाईल चार्जिंगवर लावला होता. यावेळी अचानक मोबाईलचा जोरदार स्फोट झाला. काही सेकंदातच घरभर आग पसरली आणि घरातील सर्वजण गंभीररित्या भाजले. ही घटना इतक्या लवकर घडली की, कुणालाही काही करता आले नाही.
घरातील पडदे आणि बेडशीटसह सर्व सामान जळू लागले. पालक आणि मुलांना काही समजलेपर्यंत खूप उशीर झाला होता. कसेबसे मुले व पालकांना आगीतून वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान चारही मुलांचा एकामागून एक मृत्यू झाला. मृत मुलांमध्ये 12 वर्षांची सारिका, 8 वर्षांची निहारिका, 6 वर्षांची गोलू आणि 5 वर्षांची कल्लू, यांचा समावेश आहे. वडील जॉनी यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे, पण आई बबिताची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना दिल्ली एम्समध्ये पाठवण्यात आले आहे.