'फेस रिकग्निशन' कॅमेऱ्यांची कमाल! उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड प्रयागराजच्या कुंभमेळ्यात जेरबंद
By योगेश पांडे | Updated: February 20, 2025 00:48 IST2025-02-20T00:46:46+5:302025-02-20T00:48:01+5:30
एआय कॅमेऱ्यांच्या मदतीने मोजला जातो भाविकांचा आकडा

'फेस रिकग्निशन' कॅमेऱ्यांची कमाल! उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड प्रयागराजच्या कुंभमेळ्यात जेरबंद
योगेश पांडे, प्रयागराज: ५२ कोटींहून अधिक भाविकांनी आतापर्यंत भेट दिलेल्या महाकुंभात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. विशेषत: चेंगराचेंगरीनंतर ‘एआय’ तसेच फेस रिकग्निशन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीवर जास्त पाळत ठेवण्यात येत आहे. याच ‘एफआरएस’ कॅमेऱ्यांच्या मदतीने गेल्या महिन्याभरात प्रयागराजपोलिसांनी कुंभमेळ्यातून २५ हून कुख्यात तसेच वॉन्टेंड गुंडांना ताब्यात घेतले आहे.
एकाच ठिकाणावरून गर्दीवर वॉच ठेवण्यासाठी इन्टिग्रेटेड कमांड ॲंड कंट्रोल सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. प्रयागराज शहर व संगमाजवळ मिळून २ हजार ७०० कॅमेरे लावण्यात आले आहेत. यात शेकडो फेस रिकग्निशन कॅमेऱ्यांचादेखील समावेश आहे. या कॅमेऱ्यांशी निगडीत सॉफ्टवेअरमध्ये पोलिसांनी उत्तरप्रदेशमधील वॉंटेड गुन्हेगारांचे फोटोच अगोदरच अपलोड करून ठेवले होते. त्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास २५ हून अधिक गुन्हेगारांना पकडण्यात यश आले आहे.
पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने हे आकडे अधिकृत केलेले नाहीत. मात्र एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. याच कॅमेऱ्यांच्या मदतीने हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचेदेखील प्रयत्न करण्यात येतात. मात्र बहुतांश जनता पायी चालत असून अनेकांचे फोटो व माहिती कुठल्याही डेटाबेसला नाही. त्यामुळे या फेस रिकग्निश कॅमेऱ्यांचा वापर प्रामुख्याने असामाजिक तत्व व कुख्यात गुंडांचा शोध घेण्यासाठीच करण्यात येत आहे.
एकाच सेंटरवरून ‘क्राऊड मॅनेजमेन्ट’
‘लोकमत’ने संबंधित इन्टिग्रेटेड कमांड ॲंड कंट्रोल सेंटरला भेट दिली असता तेथे पोलिसांची मोठी चमू विविध कॅमेऱ्यांच्या माध्यमांतून घाट तसेच शहरातील गर्दीवर लक्ष ठेवताना दिसून आली. या सेंटरमध्ये विविध विभागांशी संबंधित अधिकारीदेखील २४ बाय ७ उपस्थि त असतात. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवत आवश्यक त्या वेळी वाहतूक वळविण्याचे निर्देश येथूनच देण्यात येतात, अशी माहिती येथील इन्चार्ज व आयपीएस अधिकारी अमित कुमार यांनी दिली.
एआय कॅमेऱ्यांच्या मदतीने मोजला जातो भाविकांचा आकडा
महाकुंभ प्रशासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत प्रयागराजला ५६ कोटींहून अधिक भाविकांना भेट दिली आहे. ही आकडेवारी कुठून आली याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र एआय कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही आकडेवारी एकत्रित करण्यात येत आहे. विविध ठिकाणी लागलेल्या या कॅमेऱ्यांचा सॅम्पलिंग डेटा सॉफ्टवेअरमध्ये टाकून अल्गोरिदम व विशिष्ट सांख्यिकी फॉर्म्युल्याच्या आधारावर ही आकडेवारी जारी करण्यात येत आहे. यासाठी महाकुंभ प्रशासनाकडून एका मल्टिनॅशनल कंपनीचे सहकार्य घेण्यात येत आहे.