प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पीजीआय रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 05:56 AM2024-01-15T05:56:36+5:302024-01-15T06:13:13+5:30
Munawwar Rana : ९ जानेवारी रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
लखनौ: प्रसिद्ध उर्दू कवी मुन्नावर राणा याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर लखनौच्या पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू होते. ९ जानेवारी रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
पीटीआयच्या वृत्तानुसार, रविवारी रात्री उशिरा मुनव्वर राणा यांचे निधन झाले. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे मुनव्वर राणा यांची मुलगी सुमैया यांनी सांगितले. मुनव्वर राणा यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. सपा प्रमुख आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे.
२६ नोव्हेंबर १९५२ रोजी रायबरेली, उत्तर प्रदेश येथे जन्मलेल्या मुनव्वर राणा यांना उर्दू साहित्य आणि कविता, विशेषत: त्यांच्या गझलमधील योगदानामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांची काव्य शैली त्यांच्या स्पष्टतेसाठी प्रख्यात होती. पारंपारिक गझल शैलीतील आईचे गुण समोर आणणारी 'माँ' ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कविता होती. त्यांनी आपले बहुतेक आयुष्य कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये व्यतीत केले.
मुनव्वर राणा यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. मात्र, भारतात वाढत चाललेल्या असहिष्णूतेच्या निषेधार्थ २०१५ मध्ये त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार सरकारला परत केला होता. शाहदाबा या कवितेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. याशिवाय, मुनव्वर राणा यांना मिळालेल्या इतर पुरस्कारांमध्ये अमीर खुसरो पुरस्कार, मीर तकी मीर पुरस्कार, गालिब पुरस्कार, डॉ. झाकीर हुसेन पुरस्कार आणि सरस्वती समाज पुरस्कार यांचा समावेश आहे.