बाप जिंकला... लेकीला प्रोत्साहन देण्यासाठी वडिलांनी 49 व्या वर्षी दिली NEET परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 03:04 PM2023-10-19T15:04:18+5:302023-10-19T15:12:34+5:30
न्यूरोसर्जन असलेल्या डॉ. खेतान यांनी मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी NEET परीक्षेचा अर्ज भरला होता.
प्रयागराज - श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी तिचा बापच बुलंद कहानी, या कवितेच्या ओळी बाप-लेकीच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या आहेत. माध्यमांत दोन दिवसांपूर्वी एक वृत्त झळकले होते. सासरी त्रास सहन करणाऱ्या लेकीला बापाने वाजत-गाजत माहेरी आणले. सोशल मीडियावर या बापाचं जोरदार कौतुक झालं, बापाने समाजासमोर दाखवलेल्या आदर्शवत कार्याची स्तुती झाली. आता, आणखी एका बापाने लेकीसाठी दिलेल्या परिक्षेची गोष्ट समोर आलीय. मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी बापानेही NEET परीक्षा दिली अन् आश्चर्यकारक निकाल समोर आला.
न्यूरोसर्जन असलेल्या डॉ. खेतान यांनी मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी NEET परीक्षेचा अर्ज भरला होता. विशेष म्हणजे या परीक्षेत बाप-लेक दोघेही उत्तीर्ण झाले असून वडिलांना ८९ तर मुलीला ९० गुण मिळाले आहेत. त्यामुळे, या दोघांचंही जिल्ह्यात कौतुक होत आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील हा प्रेरणादायी सत्यकथा आहे.
आपल्या लाडक्या लेकीसाठी वयाच्या ४९ व्या वर्षी बापाने वैद्यकीय प्रवेशासाठी असलेली NEET परीक्षा दिली. त्यामध्ये, ८९ गुण मिळवून ते उत्तीर्णही झाले. आपल्या मुलीला NEET परीक्षेत यशस्वी झाल्याचं पाहायचं होतं. त्यामुळेच, मुलीसोबत मीही २०२३ चा अर्ज भरला होता. दरम्यान, १९९२ मध्ये डॉ. खेतान यांनी सीपीएमटी ही परीक्षा पास केली आहे. आता, ३० वर्षांनी मुलगी मिताली हिलाही डॉक्टर बनविण्याचं स्वप्न त्यांनी बाळगलं आणि ते पूर्णत्वास जात आहे. जुलै महिन्यात मितालीने कर्नाटकच्या मणिपाल कस्तूरबा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला आहे.
मुलीसोबत नीट परीक्षेसाठी डॉ. खेतान यांनी अर्ज भरला होता. यादरम्यन, आपली दैनिक ओपीडी सांभाळून त्यांनी परीक्षेची तयारी केली. वडिल आणि मुलगी दोघांमध्ये परीक्षेच्या तयारीची स्पर्धा लागली होती. त्यातून मुलीने भरपूर अभ्यास केला आणि नीट परीक्षेत ती यशस्वी झाली. वडिलांपेक्षा १ गुण जास्त घेत या स्पर्धेत मुलगी जिंकली, पण मुलीकडून हार पत्कारतही खऱ्या अर्थाने वडिलच या स्पर्धेत जिंकले. कारण, लेकीला प्रोत्साहन देण्याचं वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं, स्वप्न सत्यात उतरलं.