अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात जवानावर गोळीबार; गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:39 PM2024-03-26T22:39:58+5:302024-03-26T22:42:22+5:30

राम प्रसाद यांना तत्काळ लखनौमधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं आहे.

Firing at Ram Temple security personnel in Ayodhya; Critically injured, on ventilator | अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात जवानावर गोळीबार; गंभीर जखमी

अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात जवानावर गोळीबार; गंभीर जखमी

लखनौ - अयोध्येतील राम मंदिरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते २२ जानेवारी रोजी लोकार्पण झाले. त्यानंतर, भाविकांची मोठी गर्दी रामललाच्या दर्शनासाठी अयोध्या नगरीत येत आहे. तर, देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त दर्शनसाठी येताना पाहायला मिळते. त्याच पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बंदोबस्तातील पीएसी प्लाटूनमधील एका कमांडरला गोळी लागल्याची घटना घडली आहे. ५३ वर्षीय कमांडेंट राम प्रसाद यांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

राम प्रसाद यांना तत्काळ लखनौमधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं आहे. राम मंदिर परिसरात गोळी चालल्याचा आवाज आल्यानंतर आजुबाजूच्या सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली. त्यावेळी, राम प्रसाद यांच्या छातीवर गोळी लागली होती. त्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. याबाबत तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. तसेच, विभागातील दर्शननगर येथील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर, लखनौ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. 

राम प्रसाद हे मूळ अमेठीचे रहिवाशी असून त्यांचे कुटुंब लखनौमध्ये राहते. याबाबत अयोध्येतील आयजी रेंजचे अधिकारी प्रविण कुमार माहिती देताना सांगितले की, एका प्लाटून कमांडरला गोळी लागली आहे. दुर्दैवाने ही गोळी छातीतून पार झाल्याने शरिरातील काही भागांना गंभीर जखम आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत. तसेच, या गोळीबाराचा तपास सुरू असून पोलिसांकडून कसून चौकशी होत असल्याचंही त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Firing at Ram Temple security personnel in Ayodhya; Critically injured, on ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.