आग्रा : अंगावर काटा आणणारे दृश्य; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन् ५ महिलेसह जण दगावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 06:10 PM2023-12-02T18:10:35+5:302023-12-02T18:10:55+5:30

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक भीषण अपघात झाला.

Five people were killed after a truck collided with an auto in Uttar Pradesh's Agra, read here details  | आग्रा : अंगावर काटा आणणारे दृश्य; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन् ५ महिलेसह जण दगावले

आग्रा : अंगावर काटा आणणारे दृश्य; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन् ५ महिलेसह जण दगावले

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक भीषण अपघात झाला, ज्यात एका महिलेसह पाच जण जागीच दगावले. अंगावर काटा आणणारे अपघाताचे दृश्य समोर आले आहे. शनिवारी दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की संबंधित ऑटो रिक्षाचा पूर्ण चुरा झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रिक्षा दोन ट्रकमध्ये अडकल्याने घटनास्थळी आरडाओरडा झाला. ऑटो रिक्षात असलेल्यांना जीव वाचवण्याची संधी देखील मिळाली नाही.
 
आग्रा येथील सिकंदरा पोलीस स्टेशन हद्दीतील दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील गुरुद्वाराजवळ हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा सिकंदराकडे प्रवाशांना घेऊन जात होती. महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्याचवेळी या रिक्षाने एका ट्रकला ओव्हरटेक केला. रिक्षाच्या पुढेही एक ट्रक होता. समोरून येणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने रिक्षा जागीच थांबली पण मागून येणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन् ऑटोला चिरडले.


 
रक्ताने माखलेला रस्ता 
अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ माजली. ऑटो दोन ट्रकमध्ये अडकल्याने मोठी हानी तर झालीच शिवाय सर्व प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागला. पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर, एक महिला गंभीर जखमी अवस्थेत होती. स्थानिक आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी पोलिसांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. गंभीर असलेल्या महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ऑटोमध्ये अडकलेले मृतदेह आणि रस्ताने माखलेला रस्ता ये-जा करणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत होता. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली, त्यामुळे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला. पोलिसांनी ऑटो बाजूला घेतल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू झाली. अद्याप ऑटो चालकासह मृतांची ओळख पटलेली नाही. 

Web Title: Five people were killed after a truck collided with an auto in Uttar Pradesh's Agra, read here details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.