दोन महिलांनी कुत्र्याच्या पाच पिल्लांना जिवंत जाळलं; कारण ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 04:53 PM2024-11-09T16:53:07+5:302024-11-09T17:20:10+5:30
मेरठ येथे दोन महिलांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले.
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे दोन महिलांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. खरे तर या महिलांना कुत्र्याच्या पिल्लांचा आवाज सहन न झाल्याने त्यांनी धक्कादायक घटना घडवून आणली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांना कुत्र्याच्या पाच पिल्लांच्या आवाजाचा त्रास होत होता म्हणून त्यांनी पिल्लांना जिवंत जाळले आणि त्यांना गाढून टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एफआयर नोंदवला असून, पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
लहान पिल्लांवर पेट्रोल टाकून आरोपींनी त्यांचा जीव घेतला. मेरठ येथील कांकरखेडा परिसरात ही घटना घडली. आरोपी महिला राहत असलेल्या घराशेजारील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, भटक्या कुत्र्याची लहान पिल्ले खूप ओरडत होती. त्यांचा आवाज सहन न झाल्याने संबंधित महिलांनी त्यांना ठार केले.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना
वरिष्ठ पोलीस अधिकारी जितेंद्र कुमार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अंशुमली यांच्या तक्रारीवरुन दोन महिलांविरोधात एफआयर नोंदवण्यात आला आहे. आरोपी शोभा आणि आरती यांची अधिक चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३२५ अंतर्गत मुक्या प्राण्यांना त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही अधिक माहिती घेत असून आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे पाच नोव्हेंबरला रोहता रोडजवळील संत नगर कॉलनीत ही घटना घडली. एका भटक्या कुत्र्याने अलीकडेच पाच पिल्लांना जन्म दिला. त्यांचा आवाज सहन न झाल्याने आरोपींनी पेट्रोल टाकून जाळले.