एक कोटी घेण्यास गीता प्रेसचा नकार, गांधी शांतता पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 10:28 AM2023-06-20T10:28:24+5:302023-06-20T10:28:35+5:30
२०२१ सालासाठीचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील या संस्थेच्या विश्वस्तांची रविवारी रात्री एक बैठक झाली.
गोरखपूर : हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांचे जगातील सर्वात मोठे प्रकाशक असलेल्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राजकीय वादंग निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराची एक कोटी रुपयांची रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय गीता प्रेसने घेतला आहे.
२०२१ सालासाठीचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील या संस्थेच्या विश्वस्तांची रविवारी रात्री एक बैठक झाली. त्यात पुरस्काराची रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. विश्वस्तांनी सांगितले की, आमची संस्था कोणाकडूनही देणग्या स्वीकारत नाही. त्या परंपरेला अनुसरून आम्ही हा निर्णय घेतला. हा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे गीता प्रेसने आभार मानले आहेत.
सनातन धर्माच्या तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी जय दयाल गोयंका व घनश्यामदास जालन यांनी १९२३ साली गोरखपूर येथे गीता प्रेसची स्थापना केली होती. या संस्थेचे व्यवस्थापक लालमणी त्रिपाठी यांनी सांगितले की, गांधी शांतता पुरस्कार जाहीर होणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे.
गीता प्रेसची नाळ भारतीय संस्कृतीशी
गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर केल्याबद्दल काँग्रेसने टीका केली होती. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले होते की, मुस्लिम लीग ही सेक्युलर संघटना आहे असे विचार मांडणारे लोक वगळले तर अन्य कुणीही गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल टीका केलेली नाही. गीता प्रेस ही भारतीय संस्कृती व हिंदूच्या श्रद्धांशी जोडलेली संस्था आहे. असेही ते म्हणाले.