कुत्रा चावल्याने 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; रेबीजमुळे वडिलांच्या कुशीतच तडफडून सोडला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 10:25 AM2023-09-06T10:25:42+5:302023-09-06T10:31:15+5:30

काही महिन्यांपूर्वी मुलाला कुत्रा चावला होता, मात्र भीतीमुळे त्याने ही गोष्ट घरी सांगितली नाही आणि हळूहळू त्यांची प्रकृती ढासळू लागली.

ghaziabad 14 years old boy dies of dog bite in ghaziabad rabiz infection | कुत्रा चावल्याने 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; रेबीजमुळे वडिलांच्या कुशीतच तडफडून सोडला जीव

फोटो - news18 hindi

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वी शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या कुत्र्याने 14 वर्षांच्या मुलाला चावा घेत जखमी केलं होतं. मुलाने भीतीपोटी ही गोष्ट घरात सांगितली नाही आणि काही महिन्यांनंतर रेबीजची लागण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत मुलाच्या आजोबांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी मुलाला कुत्रा चावला होता, मात्र भीतीमुळे त्याने ही गोष्ट घरी सांगितली नाही आणि हळूहळू त्यांची प्रकृती ढासळू लागली. मुलाची अवस्था पाहून पालकांनी त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने परिसरातील कुत्र्याने चावा घेतल्याचं सांगितलं. 

मुलाला त्यानंतर जिल्ह्यातील इतर अनेक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचार झाले नाहीत. याच दरम्यान मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलाला दिल्लीच्या जीटीबी आणि एम्समध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी हा आजार असाध्य असल्याचं घोषित केलं. यानंतर मंगळवारी सायंकाळी रुग्णवाहिकेतच वडिलांच्या कुशीत मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे. शाहवेज हा आठवीच्या वर्गात शिकत होता. 

वडील याकुब यांनी सांगितले की, दीड महिन्यांपूर्वी शाहवेजला कुत्रा चावला होता. मात्र त्याने हे घरी सांगितलं नाही. 1 सप्टेंबर रोजी शाहवेजला पाण्याची भीती वाटू लागली. विचित्र गोष्टी करायच्या. कधी कधी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाजही तोंडातून येऊ लागला. त्यानंतर स्थानिक डॉक्टरांना दाखवलं असता त्यांनी रेबीजची लक्षणे असल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी दिल्लीतील मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यानंतर एम्ससह अनेक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तो असाध्य आजार असल्याचं सांगत मुलाला दाखल करण्यास नकार दिला.

एसपी सिटी निमिष पटेल यांनी सांगितले की, गाझियाबाद पोलिसांनी 14 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांच्या विनंतीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. शिवाय या संपूर्ण प्रकरणात महापालिकेने नोटीसही बजावली आहे. मृत मुलाच्या कुटुंबीयांनी ज्या महिलेवर आरोप केले आहेत तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसमध्ये लिहिले आहे की, कुत्र्यामुळे आसपासच्या लोकांना त्रास होत असून रेबीज पसरण्याचाही धोका आहे. तुम्ही लवकरात लवकर सर्व कुत्र्यांचे लसीकरण करून घ्या, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल आणि 5000 रुपयांचा दंडही ठोठावला जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: ghaziabad 14 years old boy dies of dog bite in ghaziabad rabiz infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.