रामललाच्या दर्शनासाठी विमानाने चला; लवकरच 'मुंबई ते अयोध्या' विमानसेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 04:58 PM2023-12-26T16:58:10+5:302023-12-26T17:03:05+5:30
अयोध्येतल्या विकासकामांनाही प्रचंड वेग आला आहे.
मुंबई - देशभरात रामजन्मभूम अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवर आणि दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. तर, देशाच्या कानाकोपऱ्यातूनही भाविक राम मंदिर सोहळ्यात सहभागी होत आहेत. तत्पूर्वीच, केंद्र सरकारने अयोध्येतील विमानतळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच्या हस्ते ३० डिसेंबर रोजी या विमानतळाचं उद्घाटन होत आहे. त्यातच, आता मुंबईतूनही विमानाने अयोध्येला जाता येणार आहे. इंडिगोने मुंबई-अयोध्या विमानसेवेची घोषणा केली.
अयोध्येतल्या विकासकामांनाही प्रचंड वेग आला आहे. अयोध्येतल्या श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० डिसेंबरला होत आहे. त्याच दिवशी पंतप्रधान मोदी अयोध्या रेल्वे स्थानकाचेही लोकार्पण करतील. त्यामुळे, देशातील दळणवळण सुविधा अधिक गतीमान होत आहे. तर, विमान कंपन्यांकडूनही अयोध्या जाण्यासाठी सेवा देण्यासंदर्भात आढावा घेतला जात आहे. विशेष म्हणजे इंडिगो कंपनीने दिल्ली ते अयोध्या विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, आता मुंबई ते अयोध्या विमानसेवा सुरू करण्याचीही घोषणा केली आहे.
३० डिसेंबर रोजी दिल्ली ते अयोध्या या विमानसेवेचं उद्घटन इंडिगोकडून होणार आहे. तर, ६ जानेवारीपासून प्रवाशांना या विमानसेवेचा लाभ घेता येईल. अगोदर दिल्ली ते अयोध्या ही विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानंतर, मुंबई ते अयोध्या ही विमानसेवा सुरू होईल. त्यामुळे, महाराष्ट्रातील भाविकांसाठी ही पर्वणीच असणार आहे. धार्मिक पर्यटन किंवा राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी थेट विमानाने अयोध्येला अवघ्या काही तासांत पोहोचता येणार आहे.