Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी SIT च्या अहवालानंतर मोठी कारवाई, एसडीएम-सीओसह सहा अधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 01:43 PM2024-07-09T13:43:37+5:302024-07-09T13:43:54+5:30
Hathras Stampede: या अहवालाच्या आधारे एसडीएम आणि सीओवर कारवाई करण्यात आली आहे. सरकारने दोघांनाही निलंबित केले आहे.
हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी एसआयटीने गेल्या शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तपास अहवाल सादर केला होता. यामध्ये १०० जणांचे जबाब नोंदवण्यात आले. आता या अहवालाच्या आधारे कारवाई करण्यात येत आहे. या अहवालाच्या आधारे एसडीएम आणि सीओवर कारवाई करण्यात आली आहे. सरकारने दोघांनाही निलंबित केले आहे.
एसडीएम आणि सीओ यांच्यासह सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. एसआयटीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी एडीजी आग्रा आणि अलिगड आयुक्तांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी त्यांनी एक समितीही स्थापन केली होती. एसआयटीमध्ये एडीजी आग्रा झोन अनुपम कुलश्रेष्ठ आणि विभागीय आयुक्त चैत्रा व्ही यांचा समावेश होता. त्यांना २४ तासांत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारने दिले होते.
गेल्या बुधवारपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत व बचाव कार्याला गती दिल्याने तपास अहवाल निर्धारित कालावधीत सादर होऊ शकला नाही. यानंतर अधिकाऱ्यांनी आपला तपास अहवाल तयार करण्यासाठी सरकारकडे तीन दिवसांचा अतिरिक्त वेळ मागितला होता. आता तपास अहवाल आल्यानंतर येत्या काळात सरकार काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे २ जुलै रोजी भोले बाबा साकार हरी यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ८० हजार लोकांना सहभागी होण्यासाठी प्रशासनाने मान्यता दिली होती, मात्र, अडीच लाखांहून अधिक लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर लोक बाहेर जात होते, तेव्हा चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यात लहान मुलांसह १२१ जणांना जीव गमवावा लागला.