ह्रदयद्रावक... मोबाईल चार्जिंग करताना स्फोट; भीषण दुर्घटनेत ४ लहानग्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 17:56 IST2024-03-24T17:55:33+5:302024-03-24T17:56:27+5:30
मुजफ्फरनगरचे मूळ रहिवाशी असलेल्या जॉनी यांचे कुटुंब पल्लवपुरम येथील जनता कॉलोनीत भाड्याचा घरात राहात आहे.

ह्रदयद्रावक... मोबाईल चार्जिंग करताना स्फोट; भीषण दुर्घटनेत ४ लहानग्यांचा मृत्यू
मेरठ - उत्तर प्रदेशातील एका घरात मोबाईल चार्जिंग करताना भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेतील कुटुंबातील ४ लहानग्यांचा मृत्यू झाला असून २ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. मोबाईल चार्जिंग करताना शार्ट सर्कीट होऊन स्फोट झाल्याने आगीत जळून चौघांना मृत्यू झाला आहे. मेरठमधील पल्लवपुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता कॉलोनी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुजफ्फरनगरचे मूळ रहिवाशी असलेल्या जॉनी यांचे कुटुंब पल्लवपुरम येथील जनता कॉलोनीत भाड्याचा घरात राहात आहे. जॉनी हा मजुरीचं काम करत असून होळीचा दिवस असल्याने तो घरात नव्हता. घरात त्याची पत्नी बबिता जेवण बनवत होती. तर, जॉनीची मुलगी सारिका (१०), निहारिका (८) आणि मुलगा गोलू (६) व कालू (५) हेही घरात होते. यावेळी घरातील इलेक्ट्रीक बोर्डवर मोबाईल चार्जिंगसाठी लावण्यात आला होता. अचानक चार्जिंगला लावलेल्या मोबाईलमध्ये शॉट सर्कीट झाले अन् स्फोट झाला.
चार्जिंग वायरमधील स्फोटानंतर ठिणगी बाजूलाच असलेल्या बेडवर पडल्याने घरात आगीता भडका उडाला. या आगीने रौद्र रुप धारण केल्याने घरातील लहानगी मुलेही आगीच्या झोतात आली. त्यावेळी, मोठी मुलगी सारिका आणि तिची आई बबिता यांनी मुलांना वाचवण्यासाठी धडपड केली. त्यामध्ये, या दोघीही गंभीर जखमी (भाजल्या) झाल्या आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, आगीत जखमी झालेल्या सर्वांनाच खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, निहारिका आणि कालू यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तर, दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान आणखी दोन बालकांचा मृत्यू झाला.
दरम्यान, बबिता आणि जॉनी यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचीही प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, या ह्रदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.