२२ जानेवारीला शाळा-कॉलेजेसना सुट्टी, वाईनशॉपही बंद; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 06:01 PM2024-01-09T18:01:56+5:302024-01-09T18:11:56+5:30
२२ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील सर्वच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात यावी
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, अयोध्येत सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत १७ लाख भाविकांचा मेळा जमणार असल्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने सरकारने सुरक्षा व्यवस्थाही तैनात केली असून आर्मीसह, एनएसजी कमांडो आणि स्नायपरही तैनात असणार आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर देशभरात राम मंदिर सोहळ्याचा उत्साह असल्याने २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात आता युपीतील योगी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
२२ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील सर्वच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात यावी. तसेच, या दिवशी मद्यविक्रीलाही बंदी घालण्यात आली असून वाईन शॉप बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित विभागांना दिले आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत मोठा उत्सव असून देशभरात हा सोहळा साजरा होणार आहे. त्यामुळे, इतरही राज्यांतील सरकारकडे या सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी होत आहे. महाऱाष्ट्रातही भाजपा नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातही २२ जानेवारी रोजी शाळा व कॉलेजेसना सुट्टी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
Uttar Pradesh CM Yogi Adityanath has given instructions to declare a holiday in all educational institutions across the state on January 22, in view of Ram Temple 'Pran Pratishtha' ceremony
— ANI (@ANI) January 9, 2024
The CM has also said that liquor shops will remain closed in the state on the day.
(file… pic.twitter.com/zsNu06lMZO
देशभरात २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह असून बाजारातही चांगलीच रेलचेल पाहायला मिळत आहे. या एका दिवशी तब्बल ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यापारी संघटनेच्या प्रमुखांनी वर्तवला आहे. त्यामुळे, राम जन्मभूमी सोहळ्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. तूर्तात युपीतील योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातून ८८९ जणांना निमंत्रण
दरम्यान, महाराष्ट्रातून एकूण ८८९ जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये ५३४ विशेष निमंत्रित आहेत. त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.तर महाराष्ट्रातील ३५५ साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.