ICU बाहेर शूज काढायला सांगितल्याने महापौर संतापल्या; रुग्णालयासमोर पाठवला बुलडोझर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 03:47 PM2023-08-23T15:47:15+5:302023-08-23T16:09:07+5:30
महापौर सुषमा खर्कवाल बिजनौर भागातील रुग्णालयात एका रुग्णाला पाहण्यासाठी आल्या होत्या. आयसीयूमध्ये जाण्यापूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना शूज काढण्यास सांगितले तर त्या संतापल्या.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या महापौर सुषमा खर्कवाल बिजनौर भागातील रुग्णालयात एका रुग्णाला पाहण्यासाठी आल्या होत्या. आयसीयूमध्ये जाण्यापूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना शूज काढण्यास सांगितले तर त्या संतापल्या. त्यानंतर रुग्णालयाबाहेर बुलडोझर पोहोचला. रुग्णालयाबाहेर लावलेले पोस्टर्स काढले जाऊ लागले. मात्र, गोंधळ वाढताच पोलिसांनी धाव घेत प्रकरण शांत केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र कुमार यांच्यावर लखनौच्या बिजनौर पोलीस ठाण्याजवळील विनायक मेडिकेअर या खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. याच दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा महापौर सुषमा खर्कवार याही त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा महापौरांसह त्यांचे कार्यकर्ते आयसीयूमध्ये प्रवेश करू लागले तेव्हा त्यांना थांबवण्यात आलं, ज्यामुळे त्या संतप्त झाले.
सायंकाळी महापालिकेचा बुलडोझर रुग्णालयाबाहेर पोहोचला आणि तेथे लावलेले बॅनर, पोस्टर्स फाडण्यास सुरुवात केली. हे पाहून रुग्णालयातील कर्मचारीही बाहेर आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले. मोठ्या कष्टाने प्रकरण शांत झाले. मात्र, महापालिकेचे कर्मचारी आणि रुग्णालयातील कर्मचारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत राहिले.
रुग्णालयाचे संचालक मुद्राका सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महापौर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये जाण्यापासून रोखलं. त्या सर्व लोकांनी शूज घातले होते. शूज न काढता ते आयसीयू वॉर्डमध्ये जाऊ लागले. आयसीयू वॉर्डमध्ये शूज काढल्यानंतरच आत जाण्याची परवानगी आहे.
महापौरांना या घटनेचा राग आला आणि सायंकाळीच रुग्णालयाबाहेर बुलडोझर पाठवला.दुसरीकडे महापालिकेच्या महापौरांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र महापालिका कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महापौर केवळ रुग्णाला भेटण्यासाठी एकट्याच जात होत्या. तरीही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना आत जाऊ दिलं नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.