बाशिंग बांधलं अन् विपरीत घडलं...; लग्नमंडपातून निघाली नवऱ्याची अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 08:41 AM2023-05-31T08:41:00+5:302023-05-31T08:41:31+5:30
नवऱ्याची प्रकृती ढासळल्याने त्याला तातडीने घरच्यांनी मुस्तफाबादच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेले.
बहराइच - उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी तयार झालेल्या नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. नवरदेवाची प्रकृती अचानक बिघडल्याने गोंधळ झाला. नातेवाईकांनी तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नवरदेवाच्या मृत्यूची बातमी मिळताच कुटुंबामध्ये शोककळा पसरली. लग्नासाठी टाकलेल्या मंडपात नवरदेवाचा मृतदेह आला.
लग्नघरात दु:खाचे वातावरण पसरले, वऱ्हाडातून लग्नाला निघालेले लोक नवरदेवाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जरवल रोडच्या अटवा गावातील आहे. याठिकाणी रामलालचा मुलगा राजकमल याचे वऱ्हाड अटैसा गावात जाणार होते. घरी लग्नाचा माहौल होता. लग्नाची सर्वच तयारी पूर्ण झाली होती. नवरदेव राजकमलचे वऱ्हाड निघण्याच्या तयारीत होते. राजकमल तयार झाला होता. बाशिंग बांधले होते तितक्याच नवऱ्या मुलाची तब्येत अचानक बिघडली.
नवऱ्याची प्रकृती ढासळल्याने त्याला तातडीने घरच्यांनी मुस्तफाबादच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. डॉक्टरांनी सांगितले की, राजकमलचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला. ही दु:खद वार्ता ऐकून कुटुंबाने टाहो फोडला. लग्नघरात शांतता पसरली. सनई वाजायची थांबली. घटनेची माहिती मिळताच नवरीकडील मंडळीही राजकमलच्या घरी पोहचले. काही तासांपूर्वी ज्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. सगळेच आनंदात होते त्या आनंदावर राजकमलच्या मृत्यूने विरजण पडले.
जिथून वऱ्हाड निघणार होते तिथून अंत्ययात्रा निघाली
लग्नासाठी वऱ्हाड निघणार होते, त्यासाठी नातेवाईक, पै-पाहुणे, मित्रमंडळी जमा झाली होती. परंतु त्याच लोकांना नवऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागले. शोकाकुळ वातावरणात राजकमलची अंत्ययात्रा निघाली. नवऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकमलच्या मृत्यूने त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला. मुलाच्या लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या आई वडिलांना त्याची अंत्ययात्रा पाहून धाय मोकलून रडायला आले.