"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 04:29 PM2024-05-08T16:29:47+5:302024-05-08T18:23:56+5:30
Lok Sabha Election 2024 : खेरी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अजय मिश्रा टेनी यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या निवडणूक रॅलीत अमित शाह संबोधित करत होते.
Amit Shah in UP : लखीमपूर खेरी : लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास अयोध्येच्या राम मंदिरावर 'बाबरी' नावाचे कुलूप लावले जाईल, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी केला. खेरी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अजय मिश्रा टेनी यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या निवडणूक रॅलीत अमित शाह संबोधित करत होते. यावेळी इंडिया आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव यांच्या विधानाचा संदर्भ देत अमित शाह म्हणाले की, राम गोपाल यादव हे राम मंदिर निरुपयोगी असल्याचे सांगतात. माझे विधान लक्षात ठेवा. लोकसभा निवडणुकीत थोडीशीही चूक केली तर हे लोक बाबरीच्या नावाने राम मंदिराला कुलूप लावतील.
राम मंदिराचा मुद्दा ७० वर्षे प्रलंबित ठेवून काँग्रेसने फसवणूक केल्याचा आरोप सुद्धा अमित शाह यांनी केला. ते म्हणाले, तुम्ही नरेंद्र मोदीजींना दुसऱ्यांदा पंतप्रधान केले. याप्रकरणाची केसही त्यांनी अवघ्या पाच वर्षात जिंकली. राम मंदिराचे भूमीपूजनही केले आणि प्राणप्रतिष्ठापणा करून जय श्री रामची घोषणा दिली. पुढे अमित शाह म्हणाले, "प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे निमंत्रण सर्व विरोधी नेत्यांना दिले होते, पण ते गेले नाहीत, कारण त्यांना त्यांच्या व्होटबँकेची भीती आहे. त्यांची व्होट बँक कोण आहे? तुम्हाला माहीत आहे ना?"
मोदीजी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात १९० जागा पार करत आहेत. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपा चौथ्या टप्प्यात ४०० जागांच्या दिशेने जोरदार वाटचाल करत आहे. सपा, बसपा आणि काँग्रेस उद्ध्वस्त झाली आहे, असे अमित शाह म्हणाले. तसेच, सुधारित नागरिकत्व कायद्याचा संदर्भ देत अमित शाह म्हणाले, मोदीजींनी नुकताच पाकिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन लोकांना नागरिकत्व देण्यासाठी कायदा आणला. खेरीमध्येही अनेकांकडे नागरिकत्व नाही. त्यांना नागरिकत्व मिळाले पाहिजे की नाही? असे म्हणत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला.