AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 06:30 PM2024-09-29T18:30:45+5:302024-09-29T18:32:24+5:30
आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा गैरवापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
artificial intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा गैरवापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून याचाच प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. इथे दोन विद्यार्थ्यांनी एआयच्या मदतीने आपल्याच शाळेतील महिला शिक्षकाचे अश्लील फोटो बनवले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शिक्षकांना धीर दिला. विद्यार्थ्यांच्या या कृत्यामुळे इतरही शिक्षक नैराश्याच्या छायेत आहेत. या प्रकरणी पीडित शिक्षिकेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. महिला शिक्षिकेचा आरोप आहे की, जेव्हा तिने या घटनेची तक्रार मुख्याध्यापकांकडे करायला सांगितली तेव्हा आरोपी विद्यार्थ्यांनी इतर शिक्षकांचे फोटो बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.
खरे तर आरोपींनी महिला शिक्षिकेचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. महिला शिक्षिकेने सोशल मीडियावर तिचे अश्लील फोटो पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कृत्य करणारे विद्यार्थी नववीतील असल्याचे शिक्षिकेने तक्रारीत सांगितले आहे.
नववीतील विद्यार्थ्यांचा कारनामा
पीडित शिक्षिकेने तक्रारीत म्हटले आहे की, दोन्ही विद्यार्थ्यांनी एआयचा वापर करून महिला शिक्षिकेचे अनेक आक्षेपार्ह फोटो तयार करून ते सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या घटनेची दखल घेत पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. जे काही तथ्य समोर येईल त्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.