ऐकावं ते नवलच! ड्युटी संपली म्हणून मोटरमनने रेल्वे उभी करून केला आराम; ४ तास प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 07:48 PM2023-11-29T19:48:26+5:302023-11-29T19:48:42+5:30
उत्तर प्रदेशातील बाराबकी जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे.
बाराबकी : हे सोशल मीडियाचं जग आहे, इथे कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. अशीच एक अनोखी घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. उत्तर प्रदेशातील बाराबकी जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे ड्युटी संपली म्हणून दोन रेल्वे गाड्यांचे मोटरमन गाडी मध्येच थांबवून आराम करण्यासाठी निघून गेले. खरं तर स्थानकापासून दूर असलेल्या या दोन्ही गाड्या चार तास एकाच जागी उभ्या होत्या. यातील एका मोटरमनला वाटले की, रेल्वे व्यवस्थापन काहीतरी मार्ग काढून गाड्या पाठवून देईल, मात्र दुसरा चालक पुढील प्रवासासाठी तयारच न झाल्याने एकच खळबळ माजली.
दोन रेल्वे गाड्या बराच वेळ जागीच उभ्या असल्याने इतर गाड्यांना देखील याचा फटका बसला. प्रवाशांनी आपला संताप व्यक्त करताना रेल्वे प्रशासनाला लक्ष्य केले. बाराबकी जिल्ह्यातील बुढवल रेल्वे स्थानकाजवळील या घटनेने अनेकांचे लक्ष वेधले. सहरसा एक्सप्रेस प्रवाशांना घेऊन दिल्लीला जात असताना हा प्रकार घडला. ही गाडी बुढवल रेल्वे स्थानकाजवळ पोहचताच मोटरमनने विश्रांतीसाठी पळ काढला. बराच वेळ गाडी एकाच जागी थांबल्याने प्रवाशांनी आक्रोश केला. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर जाऊन चौकशी केली असता मोटरमनची ड्युटी संपल्याने गाडी थांबली असल्याचे सांगण्यात आले.
चार तासांनंतर गाडी रवाना
ड्युटी संपल्याने मोटरमन गाडी पुढे नेण्यास नकार देत होते, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे चालकाची ड्युटी संपल्यावर दुसरा चालक गाडी पुढे नेण्यासाठी पाठवायला हवा होता, मात्र रेल्वे विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक तास गाडी उभी राहिली, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. गाडी एकाच जागी थांबवल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून रेल्वे प्रशासनाने लोको पायलटला बोलावून रेल्वेला अंतिम स्थानकापर्यंत अर्थात दिल्लीपर्यंत पोहचवले.