उष्णतेचा कहर पण पोलिसाच्या कार्याला सलाम; बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 02:14 PM2024-05-30T14:14:43+5:302024-05-30T14:15:50+5:30
देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे.
देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. बिहारमधील एका शाळेतील व्हिडीओने सर्वांच्या अंगावर काटा आला. विद्यार्थ्यांना भीषण गरमीमुळे भोवळ येऊ लागल्याने शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात देखील भीषण गरमी असून, याचा फटका प्राण्यांना देखील बसत आहे. कडक उन्हाच्या झळांमुळे एक माकड बेशुद्ध झाले. मग एका पोलीस कर्मचाऱ्याने सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवला.
पोलीस हवालदार विकास तोमर यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेशुद्ध माकड पाहताच त्यांनी धाव घेत त्याचे प्राण वाचवले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरी या पोलीस बांधवाचे कौतुक करत आहेत. अनेकांनी विकास यांच्या अप्रतिम कार्याला दाद दिली.
पोलिसाच्या कार्याला सलाम
उत्तर भारतासह देशातील विविध राज्यांमध्ये उष्णतेच्या झळा कायम आहेत. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे उष्माघातामुळे डिहायड्रेशन झाल्याने एक लहान माकड बेशुद्ध झाले होते. मग हवालदार विकास यांनी माकडावर सीपीआर केले. विकास तोमर यांनी माकडाला पाणी पाजले. यावेळी काही लोकांनी त्यांचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना २४ मेची असल्याचे कळते. याबाबत पोलीस अधिकारी भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, अति उष्णतेमुळे एक माकड झाडावरून पडले आणि बेशुद्ध झाले. आजूबाजूला बरीच माकडे जमा झाली होती.
बुलंदशहर के छतारी थाने में तैनात पुलिस कर्मी विकास तोमर ने बंदर को सीपीआर देकर बचाई जान। थाना परिसर में एक बंदर गर्मी के कारण बेहोश हो गया था। pic.twitter.com/aBwZBy3Lxx
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) May 30, 2024
माकडाच्या पिल्लाला जीवनदान देणाऱ्या विकास तोमर यांनी सांगितले की, आम्हाला अशा कठीण काळात काय करावे याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले आहे. माणसांची आणि माकडांची शरीररचना बऱ्यापैकी सारखी असते. म्हणूनच मी माकडाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या मित्रांनी मला इतर घाबरलेल्या आणि संतापलेल्या माकडांपासून वाचवले. मी माकडाच्या छातीवर सुमारे ४५ मिनिटे पंप केला, अधूनमधून चोळले आणि तोंडात थोडे पाणी टाकले. शेवटी त्याला शुद्ध आली. आता ते माकड रोज या परिसरात येते आणि त्याला इतरत्र फिरताना पाहून मला खूप आनंद वाटतो.