बांधकाम मजुराला आयकर विभागाची नोटीस; कुठून आले २ अब्ज २१ कोटी रुपये?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 10:36 AM2023-10-20T10:36:11+5:302023-10-20T10:43:03+5:30
आयकर विभागाकडून नोटीस आल्यामुळे शिव प्रसाद निषदलाही आश्चर्याचा धक्का बसला.
उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. एका कामगार व्यक्तीच्या बँक खात्यात अचानक कोट्यवधी रुपये जमा झाल्याने खळबळ उडाली. एक, दोन कोटी नसून ही रक्कम तब्बल २०० कोटी एवढी आहे. या कामगाराच्या बँक खात्यात २ अब्ज २१ कोटी ३० लाख रुपये जमा होताच, त्याला आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. बस्ती जिल्ह्यातील लालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरतनिया गावातील ही घटना आहे. बरतनिया गावचा रहिवाशी असलेल्या शिव प्रसाद निषाद यांना काही दिवसांपूर्वी आयकरची नोटीस आली आहे.
आयकर विभागाकडून नोटीस आल्यामुळे शिव प्रसाद निषदलाही आश्चर्याचा धक्का बसला. मी एक मजूर म्हणून काम करतो, पण मला आयकर विभागाकडून एक नोटीस आली आहे, त्यानुसार मोठी रक्कम माझ्या बँक खात्यात असल्याचं म्हटलंय. मात्र, याबद्दल मला काहीही माहिती नाही, असे शिव प्रसाद यांनी सांगितलं. २० ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी आयकर विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासंदर्भात ही नोटीस बाजवण्यात आली आहे. त्यामध्ये, बँक खात्यातील व्यवहाराचा तपशील देण्याचंही त्यांनी बजावलं आहे.
शिव प्रसादला आयकर विभागाची नोटीस आल्यामुळे गावात तो चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, निषाद परिवारालाही या घटनेचा त्रास होत आहे. काही महिन्यांपूर्वी माझे पॅनकार्ड हरवले होते. मला वाटते कोणी माझ्या पॅन कार्डचा वापर करुन ही रक्कम माझ्या बँक खात्यात टाकली असावी, असे निषादन म्हटले आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपेंद्र नाथ चौधरी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी स्थानिक आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, लालगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकांनाही चौकशी करण्याचे सांगण्यात आल्याचे चौधरी यांनी म्हटले.
मी बांधकाम मजूर असून दगड फोडायचे काम करतो. ज्या बँक खात्यात २ अब्ज २१ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली, ते बँक खाते माझेच आहे. मात्र, ही रक्कम कोणी आणि कशी जमा केली, याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचंही निषादने म्हटलं आहे.