मोदींनी संसद कॅन्टीनमध्ये जेवणाचे निमंत्रण दिलेले, बसपा खासदाराने पक्षच सोडला; म्हणाले, मला कुठेच बोलवत नाहीत...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 12:31 PM2024-02-25T12:31:52+5:302024-02-25T12:32:43+5:30
पांडे यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच मायावती यांनी ट्विट केले परंतु पांडे यांचे नाव घेतलेले नाहीय. तुम्ही तुमच्या क्षेत्रासाठी पूर्ण वेळ दिला आहे का? असे प्रश्न विचारले आहेत.
संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही खासदारांना आपल्यासोबत जेवण करण्याचे निमंत्रण दिले होते. यावेळी कॅन्टीनचे बिलही मोदींनी भरले होते. यास काही दिवस होत नाहीत तोच यापैकी एका खासदाराने आपल्या पक्षाचा राजीनामा देत भाजपाची वाट धरली आहे. महत्वाचे म्हणजे राजीनाम्यातच या खासदारांनी मला पक्षाच्या कार्यक्रमांना कुठेच बोलविले जात नसल्याची तक्रार केली आहे.
उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगर मतदारसंघातून बसपाचे खासदार रितेश पांडे यांनी बसपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पांडे आज भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मोदींनी अधिवेशनाच्या अखेरीस ९ खासदारांना कॅन्टीनमध्ये जेवणासाठी बोलविले होते. यामध्ये पांडे यांचा समावेश होता.
राजीनाम्यामध्ये पांडे यांनी बसपा सुप्रिमो मायवती यांचे विधानसभा आणि लोकसभेत संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. परंतु पक्षाच्या कोणत्याच बैठकांना बोलविले जात नाही, तसेच पक्षाचे नेतृत्व देखील चर्चा करत नाही, असा आरोप केला आहे. मायावती व पक्षाचे वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वारंवार प्रयत्न केला होता. परंतु यामध्ये काहीही बदल झाला नाही. या काळात मी माझ्या मतदारसंघातील लोक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांशी सतत भेट घेत होतो. आता पक्षाला माझ्या सेवेची गरज राहिलेली नाहीय या निष्कर्षावर आलो असल्याचे पांडे यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.
पांडे यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच मायावती यांनी ट्विट केले परंतु पांडे यांचे नाव घेतलेले नाहीय. बसपा हा राजकीय पक्षाबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानाच्या ध्येयाला वाहिलेली एक चळवळ देखील आहे. या पक्षाचे धोरण आणि कार्यशैली देशातील भांडवलदार पक्षांपेक्षा वेगळी आहे. हे लक्षात घेऊन पक्षही आपले उमेदवार निवडणुकीत उभे करतो, आता बसपच्या खासदारांनी हा निकष पूर्ण करून स्वत:ला तपासून पाहावे, असे मायावती यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी पांडे यांच्या राजीनाम्यावरून बसपाच्या खासदारांना इशारा दिला आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रासाठी पूर्ण वेळ दिला आहे का? तसेच, पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी त्यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे योग्य पालन केले आहे का? अशा स्थितीत लोकसभेतील बहुतांश खासदारांना तिकीट देणे शक्य आहे का, विशेषत: जेव्हा ते स्वतःच्या हितासाठी इकडे तिकडे फिरताना दिसतात आणि नकारात्मक बातम्यांमध्ये असतात, असे म्हटले आहे.