नोकरी भारतीय दूतावासात; अन् हेरगिरी पाकिस्तानसाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 08:03 AM2024-02-05T08:03:43+5:302024-02-05T08:03:59+5:30
कामाला माॅस्काेत; उत्तर प्रदेश एटीएसकडून अटक
लखनौ : रशियाची राजधानी मॉस्कोतील भारतीय दूतावासात काम करणाऱ्या एका भारतीय व्यक्तीला पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली. सतेंद्र सिवाल असे आरोपीचे नाव असून तो शाहमहिउद्दिनपूरचा रहिवासी आहे.
एटीएसने इलेक्ट्रॉनिक आणि भौतिक पाळत ठेवून सिवाल याच्यावर ही कारवाई केली. सिवाल हा २०२१ पासून मॉस्को येथील भारतीय दूतावासात संरक्षण सहायक (आयबीएसए) म्हणून काम करत आहे. आयएसआयच्या हस्तकांच्या संपर्कात राहून संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, भारतीय लष्कराची महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती पैशांसाठी देत होता. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले.