अरेरे! लोकांची भांडी घासली, बायकोने मजुरी करुन शिकवलं; अधिकारी होताच नवऱ्याचं दुसरं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:52 AM2023-07-10T11:52:11+5:302023-07-10T11:59:00+5:30
नवऱ्याला शिकवण्यासाठी बायकोने दुसऱ्याच्या घरात भांडी घासली, मजुरी करून पैसे कमावले, पण नवरा कमर्शिअल टॅक्स ऑफिसर झाल्यावर त्याने दुसरं लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशच्या SDM ज्योती मौर्य यांचे प्रकरण अजूनही देशात चर्चेचा विषय आहे. आता असेच एक प्रकरण मध्य प्रदेशातील देवासमध्ये समोर आले असून, पत्नीने पतीवर अधिकारी होताच दुसरं लग्न केल्याचा आरोप केला आहे. नवऱ्याला शिकवण्यासाठी बायकोने दुसऱ्याच्या घरात भांडी घासली, मजुरी करून पैसे कमावले, पण नवरा कमर्शिअल टॅक्स ऑफिसर झाल्यावर त्याने दुसरं लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण देवास जिल्ह्यातील बागली भागाशी संबंधित आहे.
ममता नावाच्या महिलेचा विवाह कमरू हठीले याच्याशी झाला होता. दोघांनी जून 2015 मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. कमरू पदवीधर होता, पण त्याला नोकरी नव्हती. पत्नी ममता याने त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सांगितलं. स्पर्धा परीक्षांचे फॉर्म आणि वह्यांवरील खर्चाबाबत कमरूने सांगितले तेव्हा त्याची पत्नी ममता हिने सर्व खर्चाची जबाबदारी घेतली. पतीच्या अभ्यासासाठी ममता इतर लोकांची घरं साफ करण्याची काम करायची. तिने इतरांच्या घरी भांडी घासली आणि दुकानात काम करून तिच्या पतीसाठी पुस्तके आणि नोट्स घेतल्या जेणेकरून तिचा नवरा परीक्षेची तयारी करू शकेल.
पती 2019-20 मध्ये झाला अधिकारी
शेवटी, 2019-20 मध्ये कमरूला यश मिळालं आणि त्याची कमर्शियल टॅक्स ऑफिसर पदासाठी निवड झाली. तो रतलाम जिल्ह्यात तैनात होता. याच दरम्यान, तो जोबट येथील एका तरुणीच्या संपर्कात आल्यानंतर त्याने ममताला तिच्या माहेरी पाठवले आणि तरुणीसोबत राहू लागला. ममता सांगते की, तिच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते त्यानंतर ती कमरूच्या संपर्कात आली. दोघेही जवळपास सहा वर्षे एकत्र राहिले. ममताने सांगितले की, तिचं पहिले लग्न 16 वर्षांपूर्वी झाले होते. लग्नाच्या अडीच वर्षानंतरच पतीचा मृत्यू झाला होता.
बेरोजगार पतीला पत्नीने कष्ट करून शिकवलं
कमरू सासरच्या बाजूने नातेसंबंधात होता. सासरच्या घरी राहत असताना पतीच्या निधनानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. कमरू त्यावेळी अभ्यास करायचा. कमरूला शिकवण्यासाठी खूप कष्ट केले, पण नोकरी लागल्यावर तो बदलला आणि त्याने दुसरं लग्न केलं. आता महिला न्यायासाठी घरोघरी दारोदारी आहेत. देखभालीसाठी दरमहा 12 हजार रुपये देण्याची मागणी तिने न्यायालयाकडे केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.