कानपूरचे इस्रायल कनेक्शन, 150 कोटींचा बसू शकतो फटका, जाणून घ्या कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 04:45 PM2023-10-13T16:45:30+5:302023-10-13T16:46:22+5:30
कानपूर शहरातील सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कानपूरच्या चामड्याच्या व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ शकते.
सध्या इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धाचा परिणाम इतर देशांवर सुद्धा होत आहे. इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम भारतावर सुद्धा होत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील कानपूरच्या चामड्याच्या व्यवसायावरही या युद्धाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कानपूर शहरातील सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कानपूरच्या चामड्याच्या व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ शकते. परिस्थिती पाहून शहरातील सर्व चामडे निर्यातदारांनी मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
जागतिक बाजारपेठेवर अचानक बदललेल्या जागतिक परिस्थितीचा परिणाम होईल, असे निर्यातदारांचे मत आहे. असे झाल्यास नुकसानीचा आकडा एक हजार कोटींच्या वर जाऊ शकतो, अशी भीती त्यांना वाटते. उत्तर प्रदेशमधील कानपूर हे चर्मोद्योगासाठी ओळखले जाते. कानपूरमध्ये सेफ्टी बूट आणि शूज, सॅडलरी, पिशव्या आणि इतर चामड्याच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जातात. येथील वस्तूंची जगभरात निर्यात केली जाते. यामधील सहाशे ते आठशे कोटींचा माल एकट्या इस्रायलला पाठवला जातो. यंदाही आठशे कोटींहून अधिकची मागणी आहे.
सध्याच्या परिस्थितीत तेथील व्यावसायिक माल मागवण्यास टाळाटाळ करत आहेत. निर्यातदारांच्या मते, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध यापुढेही असेच सुरू राहिले, तर शहराच्या व्यवसायासाठी ते चांगले नाही. जागतिक युगात कोणत्याही दोन देशांमधील युद्धाचा केवळ त्या देशांवरच परिणाम होत नाही, तर त्याचा परिणाम जागतिक पातळीवरही होत असतो, असेही निर्यातदारांचे म्हणणे आहे.
सध्या या युद्धाच्या जागतिक परिणामाचा फटका कानपूरच्या चर्मोद्योगालाही बसत आहे. कोरोनाच्या काळात जागतिक बाजारपेठ ठप्प झाली होती. आता हळूहळू सर्व काही सामान्य होऊ लागले आहे. आधी युक्रेन-रशिया युद्धामुळे आणि आता इस्रायल-हमास युद्धामुळे जागतिक बाजारपेठ कमकुवत झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक मोठ्या वर्क ऑर्डर्स थांबवण्यात आल्या आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत, असेही निर्यातदारांनी सांगितले.