सीमासोबत अमित यांनाही पाकिस्तानात पाठवणार; करणी सेनेने काढली विमानाची तिकिटे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 05:36 PM2023-08-12T17:36:38+5:302023-08-12T18:00:29+5:30
सीमा हैदरला परत पाकिस्तानला पाठवण्यासाठी करणी सेनेने विमानाचे तिकीट काढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन यांची लव्हस्टोरी चर्चेत आहे. मात्र, सीमा हैदरबाबतचा गोंधळ थांबताना दिसत नाही. सीमा प्रेमासाठी आली की काही दुसऱ्या हेतूने आली याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय काही लोकांकडून व्यक्त केला जात आहे. पण हे अजून सिद्ध झालेले नाही. याबाबत भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सीमा हैदरची चौकशीही करण्यात येत आहे.
दरम्यान, सीमा हैदरला परत पाकिस्तानला पाठवण्यासाठी करणी सेनेने विमानाचे तिकीट काढले आहे. यासोबतच सीमा हैदर आणि सचिन यांच्या स्टोरीवर चित्रपट बनवण्याची घोषणा करणाऱ्या अमित जानी यांचेही तिकीटही काढण्यात आले आहे. करणी सेनेने जारी केलेले तिकीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीमा हैदर आणि अमित जानी यांना पाकिस्तानात पाठवण्यासाठी करणी सेनेने ३१ डिसेंबरची तिकिटे जारी केली आहेत. दोघांचीही मुंबईहून बहारीन आणि तेथून कराचीची तिकिटे काढण्यात आली आहेत. सीमा हैदर सध्या सचिनसोबत ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे.
पाकिस्तानमधील सीमामुळे हिंदू मुलींवर अत्याचार होत असून, त्यांचे बळजबरीने धर्मांतर केले जात आहे. सीमा चुकीच्या मार्गाने भारतात आली आहे. सीमा रात्री कुठेतरी घरातून निघून जाते, असे करणी सेनेचे गौतम बुद्ध नजर जिल्हाध्यक्ष ठाकूर मनीष सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, ती पाकिस्तानी गुप्तहेर आहे, तिचा सचिनशी काही संबंध नाही, त्यामुळे पाकिस्तानचे तिकीट काढले आहे, असे मनीष सिंह यांनी सांगितले.
सीमा आणि सचिनवर चित्रपट बनवण्याबाबत मनीष सिंह म्हणाले की, "अमित जानी आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. अमित जानी यांना भारतात अभिनयासाठी मुलगी सापडली नाही का? अमित जानी यांचा आधी कुठला चित्रपट आला आहे का? त्यांच्या चित्रपट निर्मितीचा आपल्या मुलांवर चुकीचा परिणाम होईल. प्रत्येकजण अशा प्रकारे भाभी पाकिस्तानात आणू लागेल. सीमा हैदर आणि सचिन यांच्या स्टोरीवर चित्रपट बनू नये."
अंजूबाबत मनीष सिंह म्हणाले?
याचबरोबर, भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूचे तिकीट काढण्याच्या प्रश्नावर मनीष सिंह यांनी सांगितले की, मी तिला परत आणणार नाही. ती कायदेशीररित्या पाकिस्तानात गेली असून तिने पाकिस्तानात कायदेशीर विवाह केला आहे. दरम्यान, राजस्थानची रहिवासी असलेली अंजूही नुकतीच तिच्या मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली होती. तिथे इस्लाम धर्म स्वीकारून तिने नसरुल्ला नावाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे.