अयोध्येत अजूनही कारसेवकपूरम आकर्षणाचे केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 01:32 PM2024-01-01T13:32:28+5:302024-01-01T13:33:01+5:30
मूळची अयोध्येची रहिवासी असलेली आरती कारसेवकपूरम येथे चालवलेल्या कार्यशाळेत ३० वर्षांहून अधिक काळ सुशोभित नक्षीकाम केलेले दगड स्वच्छ आणि पॉलिश करत आहे.
अयोध्या : सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर अयोध्येत बरेच काही बदलले आहे, पण येथील ‘कारसेवकपूरम’ अजूनही आकर्षणाचे केंद्र आहे. मूळची अयोध्येची रहिवासी असलेली आरती कारसेवकपूरम येथे चालवलेल्या कार्यशाळेत ३० वर्षांहून अधिक काळ सुशोभित नक्षीकाम केलेले दगड स्वच्छ आणि पॉलिश करत आहे.
आरतीने सांगितले की, “हे दगड अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राममंदिराच्या बांधकामात वापरण्यात आले. या कामात आमचाही खारीचा वाटा असल्याबद्दल मला आनंद वाटतो. ” आरती आणि इतर काही महिला कामगारांनी मात्र अधिकृत कामकाजाची वेळ संपल्यानंतरही अतिरिक्त १० मिनिटे काम केले. हा अतिरिक्त वेळ देवासाठी आहे, असे ती सांगते. लोखंडी ब्लेडने आरती कोरलेल्या दगडाच्या पृष्ठभागावरील काळ्या खुणा इंच इंच काढून टाकते. तिच्या शारीरिक शक्ती आणि संयमाची परीक्षा घेणारे हे अवघड काम आहे.
कारसेवकपूरममध्ये आयोजित केलेल्या या कार्यशाळेत अनेक भाविक येतात. त्यापैकी काही केवळ श्रद्धेपोटी येथे येतात, तर काही कुतुहलापोटी.
कार्यशाळा विविध भागांत कार्यरत
कोरलेल्या दगडांचे अनेक ब्लॉक पॉलिश केल्यानंतर बांधकाम साइटवर पाठविले गेले असले तरी, कार्यशाळेचे प्रभारी अन्नू भाई सोमपुरा यांनी रविवारी सांगितले की कार्यशाळा अजूनही देशाच्या विविध भागांमध्ये कार्यरत आहे. लोक अजूनही ते ठिकाण, दगड, प्रदर्शनातील वस्तू पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येतात आणि प्रथमच भेट देणारे कुतूहलाने कार्यशाळेचे महत्त्व जाणून घेतात.