उत्तर प्रदेशात आणखी एक एन्काउंटर! 1 लाखाचे बक्षीस असलेला गुन्हेगार ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 09:58 AM2023-06-27T09:58:05+5:302023-06-27T09:58:19+5:30
Kaushambi Encounter : चकमकीच्या ठिकाणाहून एक ९ एमएम कार्बाइन, एक पिस्तूल आणि एक अपाचे बाईक जप्त करण्यात आली आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशात पोलिसांनी आणखी एक एन्काउंटर केला आहे. याठिकाणी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (UP STF) १.२५ लाख रुपयांचे बक्षीस असलेला गुन्हेगार गुफरानला एन्काउंटरमध्ये ठार केले. गुन्हेगार गुफरानवर १३ गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कौशांबी जिल्ह्यातील सामदा भागात मंगळवारी पहाटे ५ वाजता पोलिस आणि गुफरान यांच्यात चकमक झाली. यावेळी एसटीएफच्या पथकाने चकमकीत गुन्हेगार गुफरानला ठार केले.
दरम्यान, चकमकीच्या ठिकाणाहून एक ९ एमएम कार्बाइन, एक पिस्तूल आणि एक अपाचे बाईक जप्त करण्यात आली आहे. गुफरान याच्यावर खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, एडीजी प्रयागराज यांनी गुफरानवर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. दुसरीकडे, सुलतानपूर पोलिसांनी गुफरानवर २५ हजारांचे बक्षीस ठेवले होते.
प्रतापगड आणि सुलतानपूर जिल्ह्यात गुफरानवर १३ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये प्रतापगडमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार करत मोठा दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्याच्या घटनेत गुफरानचा समावेश होता, असे असल्याचे सांगण्यात येत आहे.
योगी सरकारच्या काळात सर्वाधिक एन्काउंटर
योगी आदित्यनाथ २०१७ साली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्याच्या विविध शहरांमध्ये अनेक एन्काउंटर केले आहेत. उत्तर प्रदेशातील मेरठ आणि आग्रा या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त एन्काउंटर्स करण्यात आले आहेत. त्यानंतर प्रयागराज, कानपूर आणि लखनौ जिल्ह्यात पोलिसांनी एन्काऊंटर केले आहेत.