अयोध्येत रामपथावर लाखोंचे दिवे चोरीस; ५० लाखच्या चोरीची तक्रार; रोषणाई गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 08:58 AM2024-08-16T08:58:45+5:302024-08-16T08:59:01+5:30
तब्बल ३,८०० बांबू व ३६ प्रोजेक्टर दिवे चोरीला गेल्या प्रकरणी गुन्हा दाखल
अयोध्या : उत्तर प्रदेशाच्या अयोध्येतील अत्यंत सुरक्षित क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भक्तिपथ आणि रामपथ या मार्गावरील ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रोजेक्टर दिवे व बांबू चोरीला गेले आहेत. तब्बल ३,८०० बांबू व ३६ प्रोजेक्टर दिवे चोरीला गेल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.
रामपथवर ६,४०० बांबूचे दिवे, तर भक्तिपथावर ९६ प्रोजेक्टर दिवे बसविण्यात आले होते. १९ मार्चपर्यंत सर्व दिवे जागेवर होते; मात्र ९ मे रोजी केलेल्या तपासणीदरम्यान काही दिवे गायब असल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत या दोन्ही मार्गांवरील तब्बल ३,८०० बांबू व ३६ प्रोजेक्टर दिवे अज्ञात चोरट्यांनी चोरले आहेत. चोरी झाल्याची माहिती कंपनीला मे महिन्यात मिळाली. मात्र, तब्बल दोन महिन्यांनंतर ९ ऑगस्ट रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एका मोठ्या प्रकल्पाअंतर्गत अयोध्यानगरीचे नूतनीकरण करण्यात आले होते.
हे दिवे बसवण्याची जबाबदारी यश एंटरप्रायझेस आणि कृष्णा ऑटोमोबाइल्सला देण्यात आली होती. अयोध्या विकास प्राधिकरणाने यासाठी करार जारी केला होता. ९ ऑगस्ट रोजी यश एंटरप्रायझेस आणि कृष्णा ऑटोमोबाइल्सनी दिवे गायब झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
अयोध्येतील रोषणाई गायब
- राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी उत्तर प्रदेश सरकारने मंदिरापर्यंत जाण्यासाठी तीन रस्ते बांधले होते.
- या मार्गांना राम पथ, जन्मभूमी पथ आणि भक्तिपथ अशी नावे देण्यात आली.
- या रस्त्यांवर हायटेक दिवे बसवण्यात आले. त्यामुळे रात्रीही अयोध्या उजळून निघत होती.
तक्रार २ महिने उशिरा
‘एफआयआर’नुसार यश एंटरप्रायझेस आणि कृष्णा ऑटोमोबाइल्सला मे महिन्यातच चोरी झाल्याची माहिती मिळाली होती.मात्र, ९ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल करण्यात आली. ‘एफआयआर’नंतर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.