अनुप्रिया पटेल, रामदास आठवलेंच्या राज भैयांवरील वक्तव्यांनी यूपीमध्ये भाजपाचं गणित बिघडवलं, होणार मोठं नुकसान?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 06:01 PM2024-05-22T18:01:35+5:302024-05-22T18:02:37+5:30
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवले यांनी कुंडा येथील आमदार राजा भैया यांच्याबाबत केलेल्या विधानांमुळे भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
भाजपासाठी लोकसभेमध्ये बहुमत मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये अद्याप २७ मतदारसंघातील मतदान बाकी आहे. अशा परिस्थिती २०१४ मधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाला या २७ जागा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते एनडीएच्या बाहेर असलेल्या नेत्यांसोबतही चर्चा करून समिकरणं जुळवण्याचा प्रयत्न आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाकडून कुंडा येथील आमदार आणि जनसत्ता दल लोकतांत्रिकचे प्रमुख राजा भैय्या यांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवले यांनी केलेल्या विधानांमुळे भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील ज्या २७ मतदारसंघातील मतदान बाकी आहे, त्या मतदारसंघांमध्ये क्षत्रिय मतदारांचं प्रमाण अधिक आहे. विशेषकरून प्रतापगड आणि जौनपूर या ठिकाणी ठाकूर मतदार निर्णायक भूमिकेत असतील, अशा परिस्थितीत अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवलेंच्या विधानामुळे भाजपाने जुळवलेला खेळ बिघडल्याचे बोबले जात आहेत.
त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी कौशांबी येथे प्रचाररादम्यान, अपना दलच्या अध्यक्षा आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी राजा भैया यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार आरोप केले होते. लोकशाहीमध्ये राजा, राणी पोटातून जन्माला येत नाही. तर आता राजा ईव्हीएमच्या बटणातून जन्माला येतो. स्वयंघोषित राजांना वाटतं की कुंडा ही त्यांची जहागीर आहे. त्यांचा भ्रम मोडून काढण्याची ही तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे, असं विधान अनुप्रिया पटेल यांनी केलं होतं.
दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाराणसीमध्ये बोलताना अनुप्रिया पटेल यांचं विधान योग्य असल्याचे म्हटले आहे. रामदास आठवले म्हणाले की, राजा भैय्याची पार्श्वभूमी संपूर्ण उत्तर प्रदेशला माहिती आहे. काही गुंड लोकांना मतंही मिळतात. लोकांना घाबरवून दिशाभूल करून मतं मिळवतात. असे लोक निवडूनही येतात. मात्र मतं मिळाल्याने कुणी राजा बनू शकत नाही. तो केवळ नाामधारी राजा असू शकतो, अनुप्रिया पटेल जे काही बोलल्या आहेत, ते योग्य बोलल्या आहेत.
दरम्यान, या सर्वावर पलटवार करताना राजा भैया म्हणाले होते की, आता राजा किंवा राणी जन्माला येणं बंद झालं आहे. ईव्हीएममधून राजा जन्माला येत नाही तर जनसेवक जन्माला येतो. जनतेचा प्रतिनिधी जन्माला येतो. तसेच जर ईव्हीएममधून जन्माला जेणारे स्वत:ला राजा म्हणू लागले तर लोकशाहीच्या मूळ भावनेचा पराभव होईल. जनता त्यांची सेवा करण्यासाठी, त्या भागाचा विकास करण्यासाठी ईव्हीएमचं बटण दाबून तुम्हाला ही संधी देते. राजेशाही तर कधीच संपली आहे. काही कुंठीत लोक अशा प्रकारची विधानं करतात, असा टोला राजा भैया यांनी लगावला.