Lok Sabha Election Result 2024 : उत्तर प्रदेशात भाजपच्या मित्रपक्षांना मोठा झटका, ६० पेक्षा अधिक लहान पक्षांनी खाल्ला मार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 06:01 AM2024-06-06T06:01:23+5:302024-06-06T06:01:54+5:30
Lok Sabha Election Result 2024 : उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात सक्रिय असलेल्या या दोन्ही पक्षांना त्यांच्या समाजाची मते भाजपच्या उमेदवारांना मिळवून देण्यातही अपयश आले आहे.
- राजेंद्र कुमार
लखनौ : २०१७ मध्ये भाजप ज्या मित्रपक्षांसह उत्तर प्रदेशात सत्तेवर आला होता त्यांना या लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसोबत आलेल्या राष्ट्रीय लोकदलाला सोडले तर एडीएचा भाग असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आणि निषाद पक्षालाही विजय मिळवता आला नाही.
उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात सक्रिय असलेल्या या दोन्ही पक्षांना त्यांच्या समाजाची मते भाजपच्या उमेदवारांना मिळवून देण्यातही अपयश आले आहे. भाजपचा मित्रपक्ष अपना दल (एस) देखील एक जागा जिंकू शकला. लहान पक्षांमध्ये, रालोदने आपल्या दोन्ही उमेदवारांना निवडणुकीत विजय मिळवून देण्यात यश मिळविले, तर प्रथमच निवडणूक रिंगणात असलेल्या आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी विजय मिळविला आहे.
एनडीएचा भाग असलेल्या आणि यूपीमधील अत्यंत मागासलेल्या लोकांचे राजकारण करणाऱ्या सुभासपसाठी ही निवडणूक मोठी धक्कादायक ठरली. सुभासपचे प्रमुख ओपी राजभर हे योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. भाजपने या पक्षासाठी घोसी जागा सोडली होती. या जागेवरून ओपी राजभर यांनी त्यांचा मुलगा अरविंद राजभर यांना उतरविले होते. मात्र, ओपी राजभर आपल्या मुलाला निवडणुकीत जिंकून देण्यात अपयशी ठरले. त्याचप्रमाणे निषाद पक्षाचे प्रमुख त्यांचे पुत्र प्रवीण निषाद यांना संत कबीरनगर मतदारसंघातून निवडून देऊ शकले नाहीत.
छोट्या पक्षांचे डिपॉझिट जप्त
यूपीमध्ये ओवैसी यांच्या एआयएमआयएम आणि अपना दल (के) यांनी एकत्र निवडणूक लढवली होती; परंतु या आघाडीने अतिशय खराब कामगिरी केली.
त्यांच्या सर्व उमेदवारांना त्यांचे डिपॉझिटही वाचविता आले नाही, तसेच स्वराज भारतीय न्याय पक्ष, अखिल भारतीय अपना दल, भारतीय पंचशील पक्ष, मानवधिकार पार्टी तसेच स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राष्ट्रीय शोषित समाज पक्षालाही या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.
यूपीमध्ये ६० हून अधिक छोट्या पक्षांनी आपले उमेदवार उभे केले होते; परंतु कोणालाही निवडणूक जिंकण्यात यश आले नाही. बहुतांश उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.