ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 12:04 PM2024-05-02T12:04:09+5:302024-05-02T12:07:14+5:30
lok sabha elections 2024 : चर्चेतील जागा म्हणजे उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभेची जागा आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, विविध टप्प्यांत येणाऱ्या लोकसभेच्या जागांसाठी राजकीय पक्ष अजूनही आपल्या उमेदवारांच्या नावावर चर्चा करत आहेत. यातील एक चर्चेतील जागा म्हणजे उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभेची जागा आहे. भाजपाचे ब्रिजभूषण शरण सिंह सध्या याठिकाणी खासदार आहेत.
कैसरगंजमधून कोणाला तिकीट द्यायचे याबाबत भाजपामध्ये अद्याप एकमत झालेले नाही. पण, आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, भाजपा कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट रद्द करू शकते. यासंदर्भात घोषणा पक्षाकडून लवकरच केली जाणार आहे. तसेच, भाजपा कैसरगंज मतदारसंघातून ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह यांना उमेदवारी देऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात 6 महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांसंबंधीच्या प्रकरणात 'आरोप निश्चित करण्या'वर आदेश देण्यासाठी राऊस एव्हेन्यू कोर्टाने 7 मे 2024 ही तारीख निश्चित केली आहे. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांनीही आपल्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
20 मे रोजी होणार मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी कैसरगंज लोकसभा जागेवर मतदान होणार आहे. 2019 च्या निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांनी ही जागा जिंकली होती. त्यांना 5,81,358 मते मिळाली. बसपाचे चंद्रदेव राम यादव यांना 3,19,757 तर काँग्रेसचे उमेदवार विनयकुमार पांडे यांना 3,7132 मते मिळाली. 2019 मध्ये सपा-बसपा एकत्र निवडणूक लढले होते.