तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 10:02 AM2024-05-16T10:02:57+5:302024-05-16T10:04:08+5:30

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू असून यात उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे अनोखा उमेदवार पाहायला मिळाला.

Lok Sabha Elections - Arthi Baba Rajan yadav filed nomination in Gorakhpur LS Constituency | तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय

तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय

गोरखपूर - उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे रस्त्यावर मंगळवारी दुपारी अनोखं चित्र पाहायला मिळालं. याठिकाणी तिरडीवर बसून उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीचा अर्ज भरायला पोहचला. एमबीए डिग्री हाती घेऊन कुठलीही नोकरी न करता समाजसेवेत उतरलेल्या या व्यक्तीनं मागील अनेक निवडणुका लढवल्या आहेत. तिरडीवाले बाबा उर्फ राजन यादव या नावानं लोक यांना ओळखतात. 

राजन यादव यांनी तिरडीवर बसून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचून उमेदवारी अर्ज दाखल केला. इतकेच नाही तर यादव यांनी चक्क स्मशानभूमीत निवडणूक प्रचार कार्यालय उघडलं आहे. मात्र काही त्रुटींमुळे राजन यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. गोरखपूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सातव्या टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी  उमेदवार अर्ज भरत आहेत. मंगळवारी जेव्हा हा उमेदवार तिरडीवर बसून अर्ज भरायला आला तेव्हा अनेकजण चकीत झाले. 

सध्याचं राजकारण खूप खराब झालं असून प्रामाणिक लोकांची कमतरता जाणवते. त्यामुळे मी मैदानात उतरलो आहे. मी एमबीए केले आहे. शिक्षित आहे तर सध्या सिनेमात नाचणारे, गाणारे मैदानात उतरलेत. जनता त्यांना निवडून देते. निवडणूक जिंकून संसदेत पोहचणारे बहुतांश लोक भ्रष्ट झाले, आता सभागृहाची तिरडी निघाली आहे, त्या तिरडीवर बसून मी उमेदवारी अर्ज भरायला आलो आहे. लोकांनी भ्रष्ट लोकांना निवडून देऊ नये असा संदेश मला द्यायचा असल्याचं उमेदवार राजन यादव यांनी सांगितले.

दरम्यान, भ्रष्टाचारामुळे सभागृहाची प्रतिमा मलिन झालीय. मृत व्यक्तींना स्मशानात नेले जाते, ही तिरडी नसून ही आजच्या राजकारणाची अंत्ययात्रा आहे. शिक्षण असो, आरोग्य असो सगळीकडे लोकांची फसवणूक होतेय. गरीब, दलित, मजूर यांचं ऐकणारं कुणी नाही. राजकारणाचं शुद्धीकरण व्हावं यासाठी मी अर्ज भरत आहे जेणेकरून निवडणूक जिंकेन आणि असं काही करेन ज्यातून लोकांमध्ये जागृती होईल. मी भगवान बुद्ध यांच्या चरणात गेलोय, राजकारण्यांनीही त्यांच्या चरणी जावं, ज्यामुळे प्रामाणिकपणे समाजासाठी काही तरी भलं करू शकतील असंही उमेदवार राजन यादव यांनी म्हटलं.

Web Title: Lok Sabha Elections - Arthi Baba Rajan yadav filed nomination in Gorakhpur LS Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.