"कान उघडून ऐका..., 27 चा ट्रेलर ठीक नसेल"! अयोध्येतील भाजप पराभवावर हे काय बोलून गेले महंत राजूदास?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 08:29 AM2024-06-07T08:29:43+5:302024-06-07T08:30:44+5:30
अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजुदास यांनी भाजपचा अयोध्येतील पराभव लाजिरवाणा असल्याचे म्हणत, पक्षाच्या रणनीतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. महत्वाचे म्हणजे, राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या भाजपला अयोध्येतच पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथून समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजुदास यांनी भाजपचा अयोध्येतील पराभव लाजिरवाणा असल्याचे म्हणत, पक्षाच्या रणनीतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.
अयोध्यातील पराभवावर काय म्हणाले? -
अयोध्येत भाजपच्या झालेल्या पराभवावर बोलताना हनुमान गढीचे महंत राजूदास म्हणाले, "हे दुःखद आहे. अयोध्येसारख्या शहराला 32 ते 38 लाख कोटी रुपयांचे बजेट देऊन मुख्यमंत्री योगी आणि पीएम मोदींनी विकासाचा प्रयत्न केला आणि पराभूत झाले. अयोध्या विधानसभा सुरुवातीपासून भाजपसोबत होती आणि यावेळीही आम्ही अयोध्या त्यांच्याकडेच दिली आहे."
ते म्हणाले, 'यावेळी विजयाचा आकडा फार आनंद देणारा नाही. हे निंदनीय आणि दु:खद आहे. मात्र, आपल्याला स्वतःलाच प्रश्न विचारावा लागेले की, आता सनातनची बाजू घेऊन कोण बोलणार? हिंदू धर्माच्या बाजूने कोण बोलणार? सनातन संस्कृतीवर कोण बोलणार?
भाजपवरही साधला निशाणा -
भाजप नेत्यांवर निशाणा साधत महंत म्हणाले, "मी भाजप नेत्यांना सांगू इच्छितो की, कान उघडून ऐका, जेव्हा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देणार नाही, जेव्हा तुमचे पोलीस, तहसीलदार, एसडीएम, डीएम ऐकणार नाहीत. जेव्हा पोलीस ठाण्यात आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण होईल तेव्ह अशीच स्थिती येईल. आता तर एवढेच आहे, 27 चा ट्रेलर ठीक राहणार नाही."
सोशल मीडियावरही प्रश्नचिन्ह -
यापूर्वी, हनुमान गढीचे महंत राजूदास यांनी सोशल मीडियावर लिहिले होते, 'रामायणात रामजींनी रावणासोबत युद्ध करण्यासाठी वानरांना आणि अस्वलाला नेले, हे बरो झाले! जर अयोध्येतील लोकांना नेले असते तर, यांनी लंकेतील सोन्याच्या नादात रावणासोबतही तडजोड केली असती."