video: लखनौ तिहेरी हत्याकांड; 70 वर्षीय कुख्यात आरोपी ताब्यात, NSA अंतर्गत होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 07:44 PM2024-02-04T19:44:01+5:302024-02-04T19:46:06+5:30
आरोपीचे पाकिस्तान आणि नेपाळशीही संबंध, त्या अँगलनेही पोलीस करणार तपास.
Malihabad Triple Murder: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील मलिहाबादमध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडाने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी लल्लन खान उर्फ सिराज आणि त्याचा मुलगा फराज यांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी जमिनीच्या वादातून 70 वर्षीय लल्लन आणि त्याचा मुलगा फराज याने 15 वर्षांच्या निष्पाप मुलासह तिघांची गोळ्या झाडून हत्या केली होती. तेव्हापासून दोघेही फरार होते.
घटनेनंतर होते फरार
चौकशीदरम्यान लल्लनबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सिराजचे पाकिस्तान आणि नेपाळशीही संबंध समोर येत असून, त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनेनंतर फरार आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथके त्यांचा माग काढत होती. दोघेही आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत होते, पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडले.
याबाबत डीसीपी पश्चिम राहुल राज यांनी सांगितले की, घटनेनंतर 36 तासांत दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली आहे. आरोपीचे इथर दोन मुलगे पोलंडमध्ये असून त्यांचे नेपाळ कनेक्शन समोर आले आहे. त्यामुळे ते नेपाळमार्गे पोलंडला पळून जाण्याची भीती होती. लल्लन आणि फराज यांच्याबाबत लखनौ पोलिसांनी अलर्टही जारी केला होता.
VIDEO | A land dispute led to a horrific triple murder in Lucknow's Malihabad earlier today. The deceased include a woman and a 17-year-old boy. The incident was caught on CCTV. pic.twitter.com/J3hd1Lavsj
— Press Trust of India (@PTI_News) February 2, 2024
आरोपींवर NSA
दोघांची छायाचित्रे विमानतळावरील सर्व अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली होती, जेणेकरून त्यांना विमानतळावर पकडता येईल. विमानतळासोबतच नेपाळ सीमेवरील एसएसबी आणि यूपीच्या सर्व जिल्ह्यांनाही अलर्ट केले होते. गुन्ह्यातून मिळवलेली त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. तसेच, दोन्ही आरोपींवर एनएसए लावण्यात येणार आहे. एवढा मोठा गुन्हेगार असतानाही लल्लन खानला त्याचा पासपोर्ट कसा मिळाला, याचाही तपास पोलीस करत आहेत.
नेमकी काय घटना आहे?
70 वर्षीय लल्लन खानने लखनौच्या मलिहाबादमध्ये शुक्रवारी संध्याकाळी जमिनीच्या ताब्यावरुन आपल्याच तीन नातेवाईकांची गोळ्या झाडून हत्या केली. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला. यात तो दिवसाढवळ्या गोळीबार करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, लल्लन हा त्याच्या काळातील कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर 12 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 1980 मध्ये या परिसरात खानचे वर्चस्व होते.