त्रिवेणी संगमावर २ कोटी भाविकांचे पवित्र स्नान; सरकारकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:15 IST2025-02-13T08:15:40+5:302025-02-13T08:15:56+5:30
महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारने ऑपरेशन चतुर्भुज अभियान सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

त्रिवेणी संगमावर २ कोटी भाविकांचे पवित्र स्नान; सरकारकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
महाकुंभनगर (प्रयागराज) : महाकुंभमेळ्यातील पाचवे स्नान उत्सव पर्व असलेल्या माघ पौर्णिमेच्या निमित्ताने बुधवारी दुपारी १२:०० वाजेपर्यंत २ कोटींहून अधिक लोकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले. त्यामुळे महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्रिवेणी संगमावर स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या ४८.२५ कोटींहून अधिक झाली आहे. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने कल्पवास अर्थात ध्यानधारणा करणाऱ्या दहा लाखांहून अधिक भाविकांनी आपला संकल्प पूर्ण केला. माघ पौर्णिमेनिमित्त स्नानासाठी बुधवारी पहाटेपासून लाखो महिला, पुरुष, वृद्ध व लहान मुलांची गंगा व संगमाकडे रिघ सुरू होती.
गत पौर्णिमेला कल्पवास सुरू करणाऱ्या १० लाखांपेक्षा अधिक भाविकांनी माघ पौर्णिमेदिवशी त्रिवेणी संगमावर स्नान करत आपला संकल्प पूर्ण केला. भाविकांची ये-जा सुरळीत होत आहे. आम्ही गर्दीच्या सर्व ठिकाणी खबरदारी घेत असून, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारने ऑपरेशन चतुर्भुज अभियान सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
अनिल कुंबळे यांचा ‘व्हीआयपी’ला फाटा
माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी इतर भाविकांप्रमाणे पत्नी चेतना रामतीर्थसह संगमात स्नान केले. व्हीआयपी प्रोटोकॉलशिवाय ते पत्नीसह बोटीने संगमावर गेले आणि स्नान करत सूर्यदेवाला अर्घ्य दिले. तसेच चित्रपट अभिनेते सुनील शेट्टी यांनीही संगमात स्नान केले.
वाहतूककोंडी टाळण्यासाठी खबरदारी
महाकुंभमेळ्यानिमित्त लाखो वाहने प्रयागराजच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.
वाहनांना संबंधित मार्गावरील पार्किंगमध्ये थांबवण्यात येत आहे. प्रयागराजमध्ये वाहनांची कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.