प्रमुख मार्गांवर असेल ग्रीन कॉरिडॉर; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 09:40 AM2024-01-07T09:40:12+5:302024-01-07T09:41:04+5:30
भाविकांसाठी विशेष व्यवस्था, वाहनांच्या संख्येवर आणली मर्यादा
लखनौ : अयोध्येतील भगवान रामाच्या मंदिरामध्ये २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांवर ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात येत आहे. तसेच अयोध्येत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे. या सोहळ्याला येणाऱ्या निमंत्रितांना अयोध्येच्या राम मंदिरापर्यंतचा प्रवास विनाअडथळा करता यावा, यासाठी पोलिस दक्षता घेत आहेत. गैरसोय टाळण्यासाठी मान्यवरांनी निमंत्रण पत्रिका सोबत आणण्याचे आवाहन आयुक्त गौरव दयाल यांनी केले.
भाविकांसाठी व्यवस्था
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या नंतरदेखील दररोज हजारो भाविक रामाच्या दर्शनासाठी येणार आहे. त्यांच्या निवासाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
वाहनांच्या संख्येवर आणली मर्यादा
- सोहळ्याच्या ४८ तास आधीपासून अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येईल. नागरिकांच्या हालचालींवर काही प्रमाणात बंधने येणार असून, बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या संख्येवरही नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
- या कालावधीत अयोध्येत राहणाऱ्या नागरिकांना मात्र शहरात जाऊ देण्यात येणार आहे. निमंत्रितांपैकी सर्वांच्या निवासाची उत्तम व्यवस्था होईल याची प्रशासनाने दक्षता घेतली आहे.