"मी जिवंत आहे", 27 वर्षांपासून अधिकाऱ्यांकडे मारतोय चकरा; मृत दाखवून बळकावली जमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:56 PM2023-07-19T12:56:56+5:302023-07-19T12:58:03+5:30
एका जिवंत व्यक्तीला तो जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी वर्षानुवर्षे अधिकाऱ्यांच्या दारात चकरा माराव्या लागत आहेत.
उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जिवंत व्यक्तीला तो जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी वर्षानुवर्षे अधिकाऱ्यांच्या दारात चकरा माराव्या लागत आहेत. अधिकार्यांनी कुटुंब रजिस्टरमध्ये व्यक्तीला मृत घोषित केलं आहे. आता ही व्यक्ती मुख्यमंत्र्यांकडे याचना करत आहे.
हरदोई सदर तहसील परिसरातील ग्रामपंचायत बहोरवा येथील रहिवासी आशुतोष पांडे यांचा आरोप आहे की त्यांचे वडील आंधळे आणि आई मुकी होती, याचा फायदा घेत गावातील काही लोकांनी त्याचं शेत आणि घरावर कब्जा केला. अधिकाऱ्यांच्या संगनमताने आशुतोषला फॅमिली रजिस्टरवर मृत घोषित करण्यात आले. आशुतोष पांडे यांना 1996 मध्ये मृत घोषित करण्यात आले, तेव्हापासून ते स्वत:ला जिवंत दाखवण्यासाठी अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत आहेत.
आशुतोष पांडे यांचा आरोप आहे की त्यांच्या घरावर आणि जमिनीवर काही गुंडांनी अतिक्रमण केले असून सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. ते म्हणतात की, गेल्या अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारून जिवंत दाखवण्याची विनंती करत आहे, मात्र सगळीकडून आश्वासने मिळत होती. आता ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे स्वत:ला पुन्हा जिवंत दाखवण्यासाठी विनंती करत आहेत.
योगीजींकडे न्यायाची याचना करत आहे, जर न्याय मिळाला नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही, तर मुलांना सोबत घेऊन मरण पत्करावे लागेल असंही म्हटलं आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, सर्वांनी या प्रकरणी बोलणे टाळले. मात्र, अर्ज प्राप्त झाल्याचे एसडीएम सदर स्वाती शुक्ला यांनी फोनवर सांगितले. चौकशीनंतर कारवाई केली जाईल असं त्या म्हणाल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.