पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचे माप, उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 07:42 AM2024-11-09T07:42:00+5:302024-11-09T07:45:10+5:30
Uttar Pradesh News: महिला आयोगाने दिलेला प्रस्ताव मान्य झाला तर उत्तर प्रदेशात महिलाच्या वस्त्रांचे माप पुरुष टेलर घेऊ शकणार नाहीत. तसेच पुरुषांना महिलांचे केसदेखील कापायला नको. वाईट हेतू आणि चुकीच्या स्पर्शापासून महिलांचे रक्षण करण्यासाठी राज्य महिला आयोगाने हा प्रस्ताव दिला आहे.
लखनौ - महिला आयोगाने दिलेला प्रस्ताव मान्य झाला तर उत्तर प्रदेशात महिलाच्या वस्त्रांचे माप पुरुष टेलर घेऊ शकणार नाहीत. तसेच पुरुषांना महिलांचे केसदेखील कापायला नको. वाईट हेतू आणि चुकीच्या स्पर्शापासून महिलांचे रक्षण करण्यासाठी राज्य महिला आयोगाने हा प्रस्ताव दिला आहे. गेल्या महिन्यात महिला आयोगाची बैठक झाली होती. त्यात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावांवर राज्य सरकारने कायदा मंजूर करावा, अशी विनंती आम्ही करू, असे आयोगाच्या सदस्य हिमानी अग्रवाल यांनी सांगितले.
जिम ट्रेनर, टेलर करणार विरोध
हा हुकुमशाही प्रस्ताव असल्याची टीका महिलांचे कपडे शिवणारे टेलर आणि जिम ट्रेनर यांनी केली आहे. यामुळे व्यवसायावर परिणाम होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. लवकरच ट्रेनर आणि टेलर हे एकत्रित येऊन विरोध करु, असे काहींनी सांगितले. महिला आयोगाने या प्रस्तावाचा पुनर्विचार करायला हवा, अशी मागणीही या व्यावसायिकांनी केली आहे.
असे आहेत प्रमुख प्रस्ताव
■ जिम-योगा सेंटरमध्ये येणाऱ्यांचे ओळखपत्र तपासले जावे.
■ स्कूल बसमध्येही महिला सुरक्षा कर्मचारी किंवा शिक्षिका हवी.
■ नाट्यकला केंद्रांमध्येही महिला शिक्षक नियुक्त करायला हव्या.
■ पुरुष टेलर महिलांचे माप घेऊ शकत नाहीत. माप घेताना सीसीटीव्ही आवश्यक आहे.
■ केशकर्तनालयात महिलांचे केस केवळ महिलाच कापू शकतील.
■ कोचिंग सेंटरमध्ये सीसीटीव्ही आणि वॉशरूमची व्यवस्था असायला हवी.
■ जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांची पडताळणी करावी.
महिलांना मिळेल रोजगार
महिला आयोगाच्या अध्यक्ष बबिता चौहान यांनी सांगितले की, हा प्रस्ताव महिलांना संरक्षण व रोजगार देणारा ठरेल. सर्व जिममध्ये महिला ट्रेनर व महिलांचे कपडे शिवण्यासाठी महिला टेलर ठेवावे. पूर्वी ब्युटी पार्लरमध्ये महिला कर्मचारीच असायच्या. मात्र, आता तसे नाही. वधुचा मेकअपदेखील पुरुष करतात.