भाजपा नेत्याला हेल्मेट न घातल्याने 1000 रुपयांचा दंड; कार्यकर्ते संतापले, पोलिसांविरोधात घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:42 AM2023-05-25T11:42:25+5:302023-05-25T11:49:19+5:30
भारतीय जनता पक्षाच्या बूथ अध्यक्षाला हेल्मेट नसल्याबद्दल दंड भरावा लागला. मात्र त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला.
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बूथ अध्यक्षाला हेल्मेट नसल्याबद्दल दंड भरावा लागला. मात्र त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. चौकीसमोर रस्त्यावर ठिय्या मांडून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. चौकी इन्चार्जवर जबरदस्तीने एक हजार रुपयांचे चलन कापण्यासह गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी कटघर परिसरातील रामलीला मैदानावर भाजपाची सभा होती, त्यानंतर सर्व लोक तेथून निघून गेले. चौकीचे इन्चार्ज लाजपत नगर प्रबोध कुमार सिंह हे वाहनाची तपासणी करत होते. त्याचवेळी भाजपाचे बूथ अध्यक्ष सुखदेव राजपूत जात होते. हेल्मेट न घातल्याने त्यांना थांबवण्यात आले आणि 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
हेल्मेट चोरीला गेल्याचा आरोप भाजपा नेते सुखदेव राजपूत यांच्या वतीने करण्यात आला असून चौकी इन्चार्जने त्यांचे ऐकले नाही, असभ्य वर्तन केले आणि त्यांचे 1000 रुपयांचे चलन कापले. यानंतर अध्यक्षांसह अनेक भाजपा कार्यकर्ते लाजपत नगर चौकीबाहेर जमले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
काही वेळाने भाजपाचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रकरण शांत केले. पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर सर्वांना परत पाठवण्यात आले. आता चौकी इन्चार्जने भाजपा नेत्यासोबत गैरवर्तन केले की हेल्मेट नसल्यामुळेच दंड भरायला लावला, हे तपासानंतरच कळेल.
मुरादाबादमध्ये पोलिसांकडून तपासणी मोहीम राबवली जात आहे, त्यामुळे अनेक जण हेल्मेटशिवाय गाडी चालवताना पकडले जात आहेत. लोक हेल्मेट फक्त मुख्य रस्त्यावर किंवा महामार्गावर वापरतात. या मोहिमेमुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, मात्र त्यांना त्याच पद्धतीने हेल्मेटचे महत्त्व कळणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.