हृदयद्रावक! लेकीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची हतबल आईवर आली वेळ; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 01:13 PM2023-09-08T13:13:26+5:302023-09-08T13:15:13+5:30

एक आई आपल्या 12 वर्षांच्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालली आहे. मुलीचे वडीलही तिथे आहेत.

mother carried daughter dead body on her shoulders did not get ambulance | हृदयद्रावक! लेकीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची हतबल आईवर आली वेळ; झालं असं काही...

फोटो - TV9 hindi

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक आई आपल्या 12 वर्षांच्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालली आहे. मुलीचे वडीलही तिथे आहेत. मुलीला साप चावला होता, त्यानंतर पालकांनी तिला रुग्णालयात आणलं. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मुलीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मागितली असता कर्मचाऱ्यांनी हात वर केल्याचा आरोप आहे. अखेर हतबल आईने मुलीचा मृतदेह खांद्यावरून आणला. 

केबनियाठेर पोलीस स्टेशन हद्दीतील बाबई गावात राहणाऱ्या हरपालच्या 12 वर्षांच्या मुलीला आज सकाळी साप चावला. कुटुंबीयांनी जवळच्या डॉक्टरांकडे धाव घेतली पण मुलीच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही, उलट ती आणखीनच बिघडत गेली. मुलीच्या पालकांनी तिला जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

जिल्हा रुग्णालयातच मुलीचे पालक रडायला लागले. मृतदेह नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था नव्हती. त्यावर त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिका आणण्यास सांगितलं, मात्र कर्मचाऱ्यांनी हात वर करून सध्या रुग्णवाहिका उपलब्ध होणार नसल्याचं सांगितलं. कर्मचाऱ्यांचे हे ऐकून आईने आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर उचलला आणि तिथून निघून गेली. हे पाहून त्याचे वडीलही तिच्या मागे गेले. यावेळी कोणीतरी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

एसीएमओ कमल या प्रकरणाबाबत म्हणाले की, रुग्णवाहिका न मिळाल्याची माहिती चुकीची आहे. मुलीचे पालक तिला रुग्णालयात घेऊन आले. त्यांनी सांगितलं की, कोणत्यातरी विषारी सापाने मुलीला चावा घेतला आहे. डॉक्टरांनी तपासणी केली असता अंगावर चावल्याची कोणतीही खूण नव्हती. यावर डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून मृत्यूचं नेमकं कारण कळू शकेल. रुग्णालयातील कर्मचारी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना तिची आई मृतदेह हिसकावून पळून गेली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: mother carried daughter dead body on her shoulders did not get ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.