मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा; अवधेश राय हत्या प्रकरणी निकाल आला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 02:43 PM2023-06-05T14:43:15+5:302023-06-05T14:43:47+5:30
सुनावणीदरम्यान दोषी ठरल्यानंतर मुख्तार कपाळाला हात लावून बसला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता.
माफिया मुख्तार अन्सारीला वाराणसीच्या एमपीएमएलए न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ३२ वर्षे जुन्या अवधेश राय हत्या प्रकरणी न्यायालयाने अन्सारीला दोषी ठरविले होते. या निकालानंतर अन्सारीच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. यामुळे त्याने आपले डोके पकडले होते.
बांदा जेलचे अधीक्षक वीरेश राज शर्मा यांनी सांगितले की, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्तारला कोर्टात हजर करण्य़ात आले होते. सुनावणीदरम्यान दोषी ठरल्यानंतर मुख्तार कपाळाला हात लावून बसला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता.
गेल्या वर्षभरात अन्सारीला चार प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतू, या सर्व प्रकरणांत अवधेश राय हत्याकांड महत्वाचे होते. अन्सारी विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकणार आहे. 3 ऑगस्ट 1991 रोजी अवधेश राय यांची वाराणसीतील लहुराबीर येथे त्यांच्या घराबाहेर हत्या करण्यात आली होती. व्हॅनमधील हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून अवधेश यांचा खून केला होता. घटनेच्या वेळी लहान भाऊ अजय रायही तिथे होता. तिथून हाकेच्या अंतरावर चेतगंज पोलीस ठाणे होते.
मुख्तार अन्सारी याच्यासह माजी आमदार अब्दुल कलाम, भीम सिंह, कमलेश सिंह आणि राकेश श्रीवास्तव उर्फ राकेश ज्युडिशरी यांची देखील या हत्या प्रकरणात नावे होती. या गुन्ह्यातून वाचण्यासाठी अन्सारीने कोर्टातून केस डायरी गायब केली होती. अवधेश राय यांचा भाऊ आणि माजी आमदार अजय राय यांनी मुख्तार अन्सारी सह अन्य आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला होता.