"मी जिवंत आहे", 70 वर्षीय महिला 8 वर्षे प्रूफसाठी भटकतेय; लेकीने मृत दाखवून बळकावली जमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 12:13 PM2023-06-05T12:13:02+5:302023-06-05T12:17:32+5:30
वृद्ध महिलेचा आरोप आहे की, तिची मुलगी आणि जावईही तिला शिवीगाळ करतात आणि जेवणही देत नाहीत. बँकेत ठेवलेले तिचे दागिनेही त्यांनी ताब्यात घेतले आहेत.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील 70 वर्षीय महिला आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या चकरा मारत आहे. महिलेचा आरोप आहे की, तिची मुलगी आणि जावई यांनी जमिनीसाठी तिला मृत दाखवले. तेव्हापासून ती जिवंत असल्याचा पुरावा घेऊन सरकारी अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत आहे. वृद्ध महिलेचा आरोप आहे की, तिची मुलगी आणि जावईही तिला शिवीगाळ करतात आणि जेवणही देत नाहीत. बँकेत ठेवलेले तिचे दागिनेही त्यांनी ताब्यात घेतले आहेत.
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील तांदेरा येथील रहिवासी असलेल्या 70 वर्षीय शांती देवी यांनी सांगितले की, त्यांचे पती बाबुराम यांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्याकडे जमीन होती. यामध्ये त्यांनी काही जमीन त्यांची मुलगी आणि जावयाच्या नावे केली होती. महिलेने सांगितले की, बाबुराम यांनी माझ्यासाठी काही जमीन आणि घरही ठेवलं होतं, परंतु माझी मुलगी आणि जावई यांनी सरकारी नोंदीमध्ये मला मृत दाखवून फसवणूक करून शेती आणि घर दोन्ही बळकावलं.
शांती देवी म्हणाल्या की, मुलगी आणि जावई दोघेही माझा छळ करतात आणि मला घराबाहेर काढू इच्छितात. ते दोघे मला खायलाही देत नाहीत. त्यांनी सांगितले की, 'सरकारी पेपरमध्ये स्वत:ला जिवंत दाखवण्यासाठी मी 8 वर्षांपासून सरकारी कार्यालयात चकरा मारत आहे, पण काही उपयोग झाला नाही. माझ्या पतीने त्यांच्या बँक खात्यात काही रोख रक्कमही ठेवली होती. मुलगी आणि जावयाने ते पैसेही काढून घेतले.
परिसरातील अधिकारी या प्रकरणात आरोपींची बाजू घेत असल्याचा दावा शांती देवी यांनी केला. लाच घेऊन जावई आणि मुलीला मदत केली. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांच्या न्यायालयात तक्रारही दाखल केली आहे. शांती देवी शनिवारी तहसील येथील समाधान दिवस तक्रार शिबिरात पोहोचल्या होत्या आणि त्यांनी पुन्हा एकदा अधिकार्यांना आपण जिवंत असल्याचं प्रमाणपत्र देण्याची विनंती केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.