नादच खुळा... बाप-लेक एकाचवेळी बनले लेखापाल, सैन्यातील निवृत्तीनंतर दिली परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 10:13 PM2024-01-04T22:13:48+5:302024-01-04T22:20:13+5:30
सैन्य दलातील सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रविंद्र त्रिपाठी यांनी घरी बसणे पसंत केले नाही.
लखनौ - उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्ह्यातील मुलगी व वडिल एकाचवेळी लेखपाल पदासाठी पात्र झाल्या आहेत. बाप-लेकीने एकाचवेळी परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरी मिळवल्याने कुटुंबात दुहेरी आनंदोत्सव आहे. वडिल सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर या नोकरीसाठी उत्तीर्ण झाले आहेत. तर, मुलीने पहिल्याच प्रयत्नातून हे यश मिळवले आहे. बल्दीराय तालुक्यातील उमरा-पुरे जवाहर तिवारी गावातील रविंद्र त्रिपाठी हे २०१९ साली सैन्य दलातून निवृत्त झाले होते.
सैन्य दलातील सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रविंद्र त्रिपाठी यांनी घरी बसणे पसंत केले नाही. मुलगी प्रिया त्रिपाठी हिच्यासोबत त्यांनीही शिक्षण व परीक्षांची तयारी सुरू केली. वडिलांनी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था येथून डीएलएड (डिप्लोमा इन एलीमेंट्री एजुकेशन) चा कोर्स पूर्ण केला. तर मुलीने डीएड (डिप्लोमा इन एजुकेशन) पूर्ण केले. त्यानंतर, नुकतेच वडिल आणि मुलीने लखनौ येथे महसूल खात्यात लेखपाल पदासाठी परीक्षा दिली. उत्तर प्रदेश अधीनस्त सेवा निवड आयोग द्वारा आयोजित लेखपाल पदभरतीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये, वडिल व मुलीने दोघांनीही यश मिळवले होते. या निवडीबद्दल दोघांचेही मित्र परिवार व नातेवाईकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान, युपी सरकारमधील लेखापाल पदासाठी ७८९७ उमेदवारांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामध्ये, ३१९३ उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत. ७८० ईडब्लूएस प्रवर्गातील असून १४९ उमेदवार हे इतर मागास प्रवर्गातील आहेत. तर, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून ६१५ उमेदवारांची निवड झाली आहे.